संगमनेरातील अवैध धंद्यावर ‘वर्चस्वा’साठी यंत्रणांची चढाओढ! तपासाच्या आईचा घोऽ; ‘नगरी टोळी’च्या वाढत्या हस्तक्षेपाने जिल्ह्याची वाटचाल बिहारकडे..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तपासाच्या नावाखाली मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करुन ‘मलाईदार’ दुवे शोधण्याचा नवा फंडा जिल्ह्यात आता सर्रास वापरला जात असून नगरी टोळीपासून स्थानिक ठाण्यापर्यंत सगळ्यांनीच त्याचा सोयीने वापर सुरु केला आहे. अशा प्रकारातून अनेक गंभीर घटनाही परस्पर दडपल्या जात असून त्यातून एकप्रकारे जिल्ह्यातील गुन्हेगारीला ‘कायदाश्रय’ मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘भाऊंच्या’ मार्गदर्शनाखाली ‘वसुली’चा हा नवाच प्रकार जिल्ह्यात सुरु झाल्याने त्याचे अनुकरण आता विविध पोलीस ठाण्यांमधूनही प्रत्यक्ष दिसण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन महिन्यात घडलेल्या अशा अर्धा डझनहून अधिक घटना हेच सांगत असून आता ‘भाऊं’ची दृष्टी संगमनेरातील कत्तलखान्यांकडेही वळाल्याने येणार्‍या कालावधीत कथीत बंद असलेले गाईंच्या रक्ताचे पाट पुन्हा प्रवाहित होण्याची शक्यता वाढली आहे. नव्याने विकसित होवू पाहणार्‍या वसुलीच्या या फंड्यातून गुन्हेगारांचा उन्माद वाढण्यासह जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरु झाल्याचेही आता बोलले जावू लागले आहे.

जिल्ह्याचा सधनभाग म्हणून उत्तर नगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. मुळा-प्रवरा-गोदावरी नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेल्या या भागातील संगमनेरसह श्रीरामपूर, कोपरगावच्या बाजारपेठा म्हणजे जिल्ह्याचा आर्थिक कणाच. त्यामुळे उत्तरेतील गुन्हेगारीसह अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे. मात्र गेल्या काही महिन्यात कर्तव्य सोडून या यंत्रणांनी गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर वेगळाच ‘धाक’ निर्माण करुन वसुलीचे नवे सूत्र रुजवण्यास सुरुवात केली आहे. त्यातून चोरी, घरफोडी, दरोडे, खून यासारख्या थेट व्यापारी वर्ग व सामान्य नागरिकांच्या जीवनाशी संबंधित प्रकरणातही तपासाच्या नावाखाली मिळालेल्या अधिकारांचा वापर आपल्या तुंबड्या भरण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते.

गुन्हेगार, वेगवेगळ्या घटना आणि अवैध व्यवसाय यांची नेमकी माहिती मिळवण्यासाठी ‘नगरी यंत्रणे’ने जिल्हाभर आपले म्होरके पेरले असून त्यांच्याकडून थेट अशांच्या हालचालींवर आपापले नियंत्रण प्रस्थापित करण्याची जणू चढाओढच लागल्याचे भयानक चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. मध्यंतरी सुकेवाडीतील एकाचा खून करुन त्याचा मृतदेह श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत फेकण्यात आला होता. त्या प्रकरणाच्या तपासाचे ओघळ संगमनेरात आल्यापासून भाऊंच्या टोळीचे एक एक कारनामे समोर यायला सुरुवात झाली, तेव्हापासून एकट्या संगमनेर परिसरातील अर्धा डझनहून अधिक प्रकरणात तपासासाठी मिळालेल्या ‘सीडीआर’चा वापर करुन मलाईदार दुव्यांना हेरुन त्यांना नागवले गेले आहे.

कहर म्हणजे याच नगरी टोळीने गेल्या महिन्यात संगमनेरातील सराफा बाजारात तपासाचा फार्स राबवून दोघा सुवर्णकारांकडून तब्बल किलोभर सोने जप्त करुन नेले होते. मात्र इतका मोठा कालावधी उलटल्यानंतरही जप्त करुन नेलेले सोने नेमके कोणत्या प्रकरणातील होते याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मध्यंतरी संगमनेरातील एका मोठ्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या घरातही मोठी घरफोडी होवून त्यात लाखोंचा ऐवज लंपास झाला होता. त्या प्रकरणाचे धागेदोरेही वरील कारवाईच्या वेळीच चर्चेत आले होते, विशेष म्हणजे त्या घटनेतील चोरीचे सोने घेणार्‍या एका सराफ व्यावसायिकाचे नावही त्यावेळी चर्चेत आले होते, मात्र पुढे कोणतीच कारवाई न झाल्याने इतर चर्चेप्रमाणे ‘ती’ चर्चाही हवेतच विरली.

याबाबत दैनिक नायकने प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळवून नगरी यंत्रणेचा वाढता धुडगूस वेळोवेळी समोर आणला असतानाच गुटखा घेवून निघालेला कंटेनर लुटल्याच्या प्रकरणात याच यंत्रणेने दोघांना ताब्यात घेत रायतेवाडी फाट्यावर मोठी तडजोड करुन त्यांना कोणताही गुन्हा दाखल केल्याशिवाय सोडून दिल्याचा आणि त्यानंतर लागलीच नाशिकरोडवरील एका मोठ्या जबरी चोरीच्या घटनेतील आरोपीशी संवाद झाल्याचा दुवा हुडकून त्यालाही नागवल्याचे वास्तव समोर आणले होते. मात्र या उपरांतही यंत्रणेचा धुमाकूळ कायम असल्याने जिल्ह्याची वाटचाल आता गुन्हेगारांच्या वर्दळीत हरवलेल्या बिहारसारख्या राज्याच्या दिशेने सुरु झाल्याचे नागरिकांमधूनच बोलले जावू लागले आहे.

जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांसाठी तेथील लोकसंख्येनुसार पोलीस ठाणीही असताना आणि त्यासाठी पुरेसे मनुष्यबळही दिलेले असताना नगरी यंत्रणेचा प्रत्येक प्रकरणातील हस्तक्षेप संशय वाढवणारा आहे. कायद्याच्या राज्यात कोणताही अवैध व्यवसाय पोलिसांची नजर चुकवून होवूच शकत नाही. त्यासाठी पूर्वी केवळ स्थानिक पोलिसांना ‘मॅनेज’ करावे लागत, मात्र आता ‘नगरी भाऊं’च्या राज्यात गृहमंत्री ‘देवाभाऊं’ची कारकीर्दच काळवंडण्याचे प्रकार अगदी राजरोसपणे सुरु झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारांवर स्थानिक पोलिसांपेक्षा नगरी यंत्रणेचाच ‘धाक’ निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक अवैध व्यवसायाचे धागे या यंत्रणेशी जोडले गेल्यानंतर आता घडलेल्या घटनांमध्येही थेट हस्तक्षेप करुन परस्पर आरोपी ताब्यात घेवून त्यांना नागडे करण्याचे उद्योग सुरु आहेत.

या सगळ्या घटनाक्रमातून तपास नावाचा प्रकारच हद्दपार झाला असून केवळ गुन्ह्यांची नोंद करुन त्यातील मलाईदार प्रकरणांच्या खोलात जाण्याचे उद्योग वाढले आहेत. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी चौकशीत कबुल केलेला मुद्देमालही हस्तगत झाल्याचे प्रकार समोर आले आहेत, मात्र प्रत्यक्षात ते कोणत्या गुन्ह्यातील याबाबतची माहिती आजही अंधारातच असल्याने ‘त्या’ मुद्देमालाचे काय झाले असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दोन वर्षांपूर्वी संगमनेरातील साखळी गोवंश कत्तलखान्यांवर आजवरचा सर्वात मोठा छापा पडला होता. त्यावेळी नवाज कुरेशी या कसायाकडून हस्तगत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या डायर्‍यांमध्ये पहिल्या क्रमांकावर याच नगरी यंत्रणेचे नाव आढळून आले होते. मात्र त्यानंतर ‘त्या’ डायर्‍याही गायब झाल्या आणि त्यातील लाभार्थ्यांची नावेही.

तेव्हापासून संगमनेरचे गोवंश कत्तलखाने बंद असल्याचे स्थानिक पोलीस भासवत आहेत. मात्र आता स्थानिक पोलिसांची ही गोष्टही नगरी यंत्रणेच्या डोळ्यात खुपल्याने बुधवारी सकाळीच सुरळीतपणे सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर छापा घातला गेला. यावेळी किरकोळ सहाशे किलो गोवंश मांसाच्या गुन्ह्यात तब्बल आठ आरोपी केले गेल्याने नगरी यंत्रणा गुन्हेगारांवर कसा ‘धाक’ निर्माण करते आणि त्यानंतर आपले इप्सित साध्य करते याचे मूर्तीमंत उदाहरण समोर उभे राहिले आहे. नगरी यंत्रणेकडून सुरु असलेल्या या सगळ्या घडामोडींचा प्रभाव आता स्थानिक पोलिसांच्या कामातही दिसू लागला असून तपासाच्या आईचा घोऽ करीत स्थानिक पोलिसही तपासाच्या नावाखाली ‘सीडीआर’चा वापर करुन सामान्यांना नागवत असल्याचे नवे उदाहरण आता समोर आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नगरी यंत्रणेने यापूर्वीच आपले हात धुवून घेतले आहेत.


विद्यमान उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २०१४ ते १९ हा पहिला कार्यकाळ अतिशय स्वच्छ आणि प्रशंसनीय असाच ठरला होता. मात्र सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आणि त्यातच मंत्र्यांची मर्यादित संख्या असल्याने गृह खात्यासह जवळपास डझनभर विभागांचे कामकाज एकट्या देवाभाऊंच्या खांद्यावर आहे. त्यामुळे या सगळ्याच विभागांकडे त्यांचे काहीसे दुर्लक्ष झाले असून त्याचा फायदा  घेत अशाप्रकारचे लुटीचे नवनवीन फंडे जन्माला येवू लागले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेला हा धुमाकूळ राज्यातील साखरपट्ट्याचा समृद्ध भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या उत्तर नगर जिल्ह्यासाठी पोषक ठरणारा नसून लोकप्रतिनिधींनी या गंभीर विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Visits: 7 Today: 2 Total: 22915

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *