… अन्यथा कारखान्यांचा गाळप हंगाम बंद पाडणार ः औताडे हरेगाव फाटा येथे शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अहमदनगर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने गाळपापूर्वी ऊस दर जाहीर केला नाही. राज्य सरकारकडे तक्रारी करून देखील दखल घेतली जात नाही. त्यामुळे आता गाळप हंगाम बंद पाडणार, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव फाटा येथे शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. २९) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन तीव्र असल्याने ते बराच वेळ सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू करून महिना होत आला आहे. परंतु एकाही कारखान्याने गाळपापूर्वी ऊस दर जाहीर केला नाही. पहिली उचल अजून जमा केलेली नाही. यामुळे शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आणि रस्त्यावर उतरली आहे.

यावेळी बोलताना अनिल औताडे म्हणाले, गाळपापूर्वी ऊस दर जाहीर न करणे ही कृती कारखानदारांची घटनाबाह्य आहे. त्यामुळे कारखान्याच्या व्यवस्थापन समितीवर प्रादेशिक सहसंचालक, साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून कारवाई झाली पाहिजे. परंतु साखर कारखानदारांचे सर्वेसर्वा सरकारमध्ये आहेत. त्यामुळे कारवाई होत नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीची पाचशे रुपये आणि यंदाची पहिली उचल साडेतीन हजार रुपये देणे व्यवहार्य होते. केंद्र सरकारने देखील एफआरपी दर हाच घोषित केला आहे. परंतु कारखानदारांकडून शेतकर्‍यांची फसवणूक सुरू आहे, अशी टीका अनिल औतडे यांनी केली. जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखाने हे साडेचारशे ते नऊशे कोटी रुपये तोट्यात दाखविले जात आहेत. हा दाखवलेला तोटा हा कारखाना व्यवस्थापन व राज्य सरकारचे पाप आहे. यास ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा काय दोष? त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी पहिली उचल साडेतीन हजार रुपये समान पद्धतीने ऊस उत्पादकांना द्यावी. उर्वरित दीड हजार रुपये राज्य सरकारने अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेकडून ऊस उत्पादकांच्यावतीने करण्यात आली. यावेळी यूवराज जगताप, विजय मते, त्रिंबक भद्गले, साहेबराव चोरमल उपस्थित होते. तहसीलदार मिलिंद वाघ यांनी आंदोलकांशी चर्चा करत निवेदन स्वीकारले. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Visits: 20 Today: 1 Total: 112866

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *