बारामतीच्या ‘बाबाला’ एलसीबीसाठी ‘चार’ बोकडांचा नेवैद्य! दोन बोकडांत पावलेल्या नगरच्या ‘म्हसोबा’ने दाखवला ‘भीमथडी’चा मार्ग!!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडने दिरंगाई करण्यास भाग पाडलेल्या अधिकार्यांच्या बदल्या आता भलत्याच फॉर्मात आल्या आहेत. त्यातही राज्यातील पोलीस आणि महसुल खात्याच्या बदल्यांचे तर ‘क्या कहनें!’. त्याचीच प्रचिती सध्या नगरकर घेत असून पोलीस दलात सर्वाधीक ‘भाव’ खाणार्या एलसीबीसाठी तर अनेकांनी प्रयत्नांची शर्थ करुनही जिल्ह्या बाहेरुन आलेल्या अधिकार्यानेच अखेर ‘बाजी’ मारली आहे. यासाठी त्यांनी नगरच्या ‘म्हसोबा’च्या मदतीने थेट भीमथडीच्या ‘बाबां’ना चार बोकडांचा नेवैद्य दाखवला. त्यातून प्रसन्न झालेल्या बाबांनी गुणवत्तेच्या आधारावर निश्चित झालेल्या नावालाही काट मारल्याचे विश्वसनीय वृत्त दैनिक नायकच्या हाती लागले आहे.
मोठ्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांचे खांदेपालट करण्यात आले. त्यासोबतच पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ‘प्रभारी’ अधिकार्याचीही नियुक्ति जाहीर होईल असाच कयास अनेकांनी लावला होता. या जागेसाठी त्या त्या जिल्ह्यातील सर्वच पोलीस निरीक्षक आग्रही असतात, त्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील डझनावर ‘वजनदार’ अधिकार्यांनी अगदी वर्षाच्या सुरुवातीपासून फिल्डींग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र दरम्यानच्या काळात कोविड नावाची महामारी देशात घुसली आणि त्याच्या लाटेत गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांचे मनसुबे उधळले गेले.
आठ महिन्यांच्या विलंबाने सप्टेंबरमध्ये धिम्या गतीने ही प्रक्रीया सुरु झाली तेव्हाही ‘पसंदी’चे ठाणे मिळवण्यासाठी अनेकांची कवायत पुन्हा रंगात आली. मात्र त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांचीच ‘उचलबांगडी’ झाल्याने सगळं काही अधांतरीत बनलं. त्यामुळे बदल्यांची प्रक्रीया गतीमान होता होताच थांबली. काहीशा प्रतिक्षेने जिल्ह्याला मनोज पाटील नावाचे अधीक्षक लाभले, मात्र त्यांच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नसल्याने ‘गुडघ्याला’ बांधलेल्यांना प्रतिक्षेशिवाय पर्याय राहीला नाही. त्यातच नव्या अधीक्षकांना जिल्ह्यात येताच कोविडने ग्रासले. त्यामुळे त्यांना पदभार घेवून काही दिवसांतच ‘विलगीकरणात’ जावे लागले. या कालावधीत जिल्ह्याची जबाबदारी अतिरीक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्याकडे येताच थोपलेली गुन्हेगारी उसळून वर आली. त्यातून श्रीरामपूरचे गुटखा प्रकरण, डिझेल भेसळ प्रकरण, नेवासा पोलीस ठाण्यातील कर्मचार्याची कथीत ऑडिओ क्लिप आणि संगमनेरातील उपनिरीक्षकाचा लाचखोरीचा प्रकार समोर आल्याने जिल्हा पोलीस दलाची अब्रु वेशीवर टांगली गेली.
तत्पूर्वी एलसीबीच्या जत्रेतील संगमनेरच्या भक्ताने एकाच बोकडाचा दोन भागात नेवैद्य दाखवण्याचा घाट बांधला, पण त्याला ‘देवाने’ प्रतिसाद दिला नाही. वाहतुक शाखेतील एका भक्ताने बोकडांची संख्या वाढवित पावणेदोन बोकडं वाहण्याची तयारी केली, पण फक्त वर्षभर चालणार्या जत्रेतील आपल्या दुकानातून किती खेळणी विकली जातील याबाबत त्यांच्या मनात पाल चुकचूकल्याने त्यांनीही आपला हात आकडता घेतला. त्यामुळे जत्रेतील दुकानदारांची संख्या घटत गेली, त्याचा फायदा नाशिकहून आलेल्या चाणाक्ष भक्ताने नेमका उठविला. त्याच दरम्यान ज्ञानेश्वरांच्या पावन भूमित मुंबईच्या स्वर्गातून साक्षात ‘महादेव’ अवतरले. तेव्हा त्यांच्या आदरातिथ्यात सरसावलेल्या नगरच्या ‘म्हसोबा’ने त्यांचे कान फुंकले आणि एलसीबीची नियुक्ति ‘होल्ड’ झाली, ती भीमथडीच्या भेटीनेच पुन्हा ‘ओपन’ करण्यात आली. या सर्व प्रक्रीयेतून मात्र गुणी असलेल्या पात्र भक्ताचा मोठा हिरमोड झाला.
गुन्हेगारांशी अर्थपूर्ण संबधाच्या आरोपातून जिल्ह्याच्या पोलीस दलातील वातावरण ढवळून निघालेले असतांना पोलीस अधीक्षक पुन्हा सेवेत रुजू झाले आणि त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणार्यांना माफी नसल्याचे संकेत देत कठोर भूमिका स्विकारली. त्याचा पहिला बळी अतिरीक्त पोलीस अधीक्षक तर शेवटचा बळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठरले. मात्र या सगळ्यात त्यांच्याही भूमिकेला शह देणार्या ‘राजकीय’ देवांचा अवतार झाला आणि त्यांच्या आक्राळ रुपासमोर त्यांनाही मौन बाळगून ‘वरीष्ठ’ पातळीवरुन आलेल्या निर्णयाला मूक संमती द्यावी लागली. अपेक्षप्रमाणे मंगळवारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील प्रभार्यांचे खांदे पालट निश्चित झाले, त्याचा प्रत्यक्ष आदेश बुधवारी काढण्यात आला. त्यातून संगमनेरातील संपूर्ण कारकीर्द ‘निष्क्रीय’ ठरलेल्या आणि केवळ अवैध व्यवसायांना ‘अभय’ देणार्या अधिकार्याला ‘नियंत्रणात’ घेतले गेले. मात्र त्याचवेळी गुणवत्ता असूनही केवळ ‘भीमथडी’चा आदेश आल्याने ‘एलसीबी’साठी निश्चिती मिळूनही राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना माघार घ्यावी लागली. संगमनेर शहर पोलीस ठाणे देवून एकप्रकारे त्यांचे पुनर्वसन करण्याचाच प्रयोग बुधवारच्या आदेशातून समोर आला.
जिल्ह्याची स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारीवर थेट ‘वचक’ असलेली शाखा समजली जाते. या शाखेचे निरीक्षकपद मिळणं म्हणजे पोलीस दलातील निरीक्षकांसाठी प्रतिष्ठेसोबतच ‘समृद्धीचं’ प्रतिक मानलं जातं. या शाखेसाठी सुरुवातीला संगमनेरचे निरीक्षक अभय परमार, राहुरीचे निरीक्षक मुकूंद देशमुख, शेवगावचे निरीक्षक रामराव ढिकले व नाशिक ग्रामीणमधून आलेले निरीक्षक संपत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील घडामोडींनी पोलीस अधीक्षकांना कठोर मोडमध्ये टाकले. त्यामुळे परमार व ढिकले यांचा ‘ट्रॅक’ पाहता त्यांची नावे मागे पडली, तर संपत शिंदे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून ‘अतिरीक्त’ पाठविण्यात आल्याने त्यांचे नावच स्पर्धेत नव्हते. त्यामुळे साहजिकच राहुरीच्या मुकूंद देशमुख यांची सरशी निश्चित मानली गेली.
जिल्ह्यातील ढवळलेले वातावरण, पोलीस अधीक्षकांनी घेतलेली कणखर भूमिका यामुळे प्रशासकीय पातळीवरुन आपली ‘डाळ’ शिजणार नसल्याचा पूर्वअंदाज बांधून नाशिकहून आलेल्या भक्ताने ‘राजकीय’ आधार घेत नगरच्या ‘म्हसोबा’ला शेंदूर फासला आणि ‘दोन’ बोकडांचा नेवैद्यही दाखवला, त्यामुळे प्रसन्न झालेल्या म्हसोबाने त्यांना ‘भीमथडी’च्या ‘बाबां’च्या देवळात नेले, तेथेही ‘दोन’ बोकडं कापण्यात आली, त्यातून अतिप्रसन्न झालेल्या बारामतीच्या ‘बाबां’नी गुणवत्ता टांगणीला ठेवून ‘नेवैद्य’ दाखवणार्या जिल्ह्याबाहेरुन आलेल्या भक्ताच्या डोक्यावर ‘आशीर्वादा’चा हात ठेवल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात सुरु असून आता फक्त ‘त्या’ अधिकार्याचा ‘राज्याभिषेक’ सोहळाच बाकी राहीला असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातंर्गत गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी थेट पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली येणार्या ‘स्थानिक गुन्हे अन्वेषण’ विभागाची रचना झाली. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील उकल न होणार्या गुन्ह्यांच्या तपासासह जिल्ह्यातील सर्व भागातील गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसाय यांच्यावर थेट कारवाईचा अधिकार असलेल्या या विभागात वर्णी लागणं म्हणजे प्रतिष्ठेसह समृद्धीचे प्रतिक मानले जाते. या विभागातील नियुक्ती करण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा अधीक्षकांनाच असतो. यंदा मात्र त्यांनी निश्चित केलेल्या नावाला बगल देत ‘त्या’ अधिकार्याने थेट ‘बाबां’चा आदेश आणल्याने त्यांचा तेथील कार्यकाळ कसा असेल यावर आता चर्चा रंगल्या आहेत.