अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवेदनातून तहसीलदारांकडे मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दुधाला ३४ रुपये प्रतिलिटर दर जाहीर करुनही दूध संघ व संस्था शेतकर्यांना २७ रुपयांनी भाव देत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांची फसवणूक होत आहे. त्यातच रविवारी अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने दूध दरवाढ करावी आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संगमनेरच्या तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे, की, दुधाचे दर कमी असल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आधीच शेतमालाला बाजार नाही. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करतोय. परंतु सरकारने ३४ रुपये प्रतिलिटर दर जाहीर करुनही दूध संघ व संस्था २७ रुपये दर देत आहेत. याशिवाय पशुखाद्याचे दरही गगनाला भिडलेले असल्याने दूध धंदा परवडत नाहीये.
त्यातच रविवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणखी एका संकटात सापडले आहे. संगमनेर तालुक्यातील कांदा, द्राक्ष, कपाशी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वर्पे, तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, तालुका उपाध्यक्ष तुषार बढे, बजरंग घुले, यूसुफ शेख, तालुका सचिव संजय शिंदे, संदीप आव्हाड, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष अस्लम शेख, सतीश मिंढे, अभिषेक उकिर्डे, किरण पाचरणे, हर्षद भुसारी, अजय वारे, आशिष उकिर्डे आदिंनी केली आहे.