घारगाव परिसरातून तीन मालवाहू वाहनांतून डिझेलची चोरी चोरीची घटना इंधन पंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद


नायक वृत्तसेवा, घारगाव
अहमदनगर शहर, संगमनेर तालुक्यातील तळेगाव परिसरानंतर आता पठारभागात डिझेल चोरीचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे डिझेल चोरीचे रॅकेट पुन्हा सक्रीय झाले असल्याचे अधोरेखित झाले आहे. घारगाव शिवारातून दोन इंधन पंपांच्या परिसरातून तीन मालवाहू वाहनांतून अज्ञात चोरट्यांनी डिझेल चोरुन पोबारा केल्याची घटना गुरुवारी (ता.23) पहाटे घडली असून, कारसह चालक सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. यामुळे पोलिसांनी तांत्रिक आधार घेत डिझेल चोरांच्या मुसक्या आवळाव्यात. अन्यथा पुन्हा मोठे रॅकेट अधिक सक्रीय होवून वेठीस आणण्याची शक्यता वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वाहनचालक मुन्ना यादव हा मालवाहू वाहनातून चाकण येथून पवनचक्कीचे साहित्य घेवून गुजरातला चालला होता. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरातील एका इंधन पंपासमोर थांबला आणि जेवन करून झोपी गेले. याच संधीचा फायदा उठवत पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या टाकीचे झाकन तोडून मोठ्या प्रमाणावर डिझेल चोरून नेले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून पुढे जवळच असलेल्या दुसर्‍या पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या दोन वाहनांमधूनही डिझेल चोरून नेले. ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, एका कारसह चोरटे दिसत आहे.

गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कर्मचारी किशोर लाड, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे आदिंनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. तत्पूर्वी पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. अनेक मोठी मालवाहून वाहने रात्रीच्या वेळी महामार्गालगत असलेल्या हॉटेल, पेट्रोल पंपांचा आश्रय घेतात. यापूर्वी देखील तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. तर नगरचे डिझेल चोरीचे रॅकेट सर्वश्रृत आहे. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेऊन तांत्रिक तपास करुन चोरट्यांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात. अन्यथा मोठे रॅकेट अधिक कार्यशील होवून वेठीस आणण्याची शक्यता वाहनचालकांनी वर्तविली आहे.

पठारभागात गेल्या काही दिवसांत कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. यामुळे नागरिक भयभीत असताना इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने अधिक भर पडली आहे. शेतीपंप, केबल, वाहन चोरीनंतर आता डिझेल चोरी होवू लागल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान ठाकले आहे.

Visits: 137 Today: 1 Total: 1871849

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *