देशातील शेतकरी मोदींच्या मागे ः चौहान

नायक वृत्तसेवा, शिर्डी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनविण्यात आलेले शेतकर्यांसाठीचे तीनही कायदे शेतकर्यांच्याच हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही होईल यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, देशातील शेतकरी मोदींच्या मागे उभे आहेत, जे शेतकरी समजले नाही त्यांनाही समजेल आणि नवीन वर्ष चांगले जाईल, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी शिर्डीत व्यक्त केले.

मुख्यमंत्री चौहान अनेक वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही नववर्षाचा श्रीगणेशा साईदर्शनाने करत आहेत. या निमित्ताने नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईनगरीत दाखल झालेल्या चौहान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 2020 वर्ष संकट, दु:ख व कष्टाने भरलेले होते. कोरोनाने अर्थव्यवस्था कोलमडली, अनेकांचे प्राण गेले. या वर्षाला निरोप देतानाच कोरोना या देशातून व जगातून जावो. अर्थव्यवस्था सुरळीत होवो. सर्वांचे कल्याण होवो यासाठी आपण साईबाबांना साकडे घातल्याचे चौहान यांनी सांगितले. यावर्षात अर्थव्यवस्था मजबूत करणे, रोजगार निर्मिती करणे, शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, राज्यातील आया-बहिणींना अधिक सुरक्षितता उपलब्ध करुन देणे व गुंडगिरी संपवणे हा आपला नवीन वर्षाचा संकल्प असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

