‘तो मी नव्हेच’! नावातील साधर्म्यातून पोलीस अधिकार्‍याला मनःस्ताप! संगमनेरातील कारवाईच्या वृत्ताने मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांना होतोय नाहक त्रास..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातून समोर आलेल्या नावांनी राज्यभरात खळबळ उडालेली असताना आता या प्रकरणाशी दूरुनही संबंध नसताना केवळ नावातील साधर्म्यामुळे पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याला मोठा मनःस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. यासर्व प्रकाराने व्यथित झालेल्या संबंधित अधिकार्‍याने दैनिक नायक कार्यालयाशी संपर्क साधून याबाबतची वस्तुस्थिती नागरिकांच्या समोर आणण्याची विनंती केली असून ‘शंभर कोटी’ प्रकरणात राज्य पोलीस सेवेतील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या नावाचा उल्लेख झाला असून त्यांच्याऐवजी काही माध्यमांनी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) पोलीस उपायुक्त संजय पाटील असा उल्लेख केल्याने दोन अधिकार्‍यांच्या सारख्या नावाचा फटका मुंबईच्या (वरळी) सशस्त्र पोलीस दलाच्या उपायुक्तांना बसत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईच्या सीआईयूचे प्रमुख व बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्याच पत्रात मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील व उपायुक्त राजू भुजबळ यांच्याही नावाचा उल्लेख आहे. त्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने मंगळवारी (ता.27) भुजबळ यांचे मूळगाव असलेल्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे छापा घालून झाडाझडती घेतली.

या प्रकरणाचे वार्तांकन करताना काही माध्यम प्रतिनिधींनी उपायुक्त राजू भुजबळ यांच्या मूळगावातील कारवाईचा उल्लेख करतानाच सिंग यांच्या पत्रातील अन्य पोलीस अधिकार्‍यांची नावेही समोर आणली. मात्र त्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील असा उल्लेख करण्याऐवजी पोलीस उपायुक्त संजय पाटील असा उल्लेख केला गेल्याने ज्या अधिकार्‍याचा या प्रकरणाशी दूरनही संबंध आलेला नाही अशा अधिकार्‍याच्या नावावर शिंतोडे उडविले गेले आहेत. काही माध्यमांच्या ‘ब्रेकींग’च्या नावाखालील उतावळेपणामूळे एका प्रामाणिक अधिकार्‍यावरच संशयाची सुई फिरल्याने त्यांना नाहक मनःस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. चुकीचा उल्लेख झालेले पोलीस उपायुक्त संजय पाटील 2003 ते 2005 या कालावधीत संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या येथील कारकीर्दीत त्यांच्यातील कर्तव्यतत्परतेची झलक अनेकांनी अनुभवलेली आहे.

विभागीय गस्तीची संकल्पना राबविण्यासह आठवठ्यातील एक दिवस स्वतः गस्त घालण्याची पद्धतही त्यांनीच सुरु केली होती. त्यांच्या कार्यकाळात संगमनेरातील गुन्हे उघड होण्याचे प्रमाणही उच्चांकी होते. संगमनेरकरांच्या मनात स्थान निर्माण करणार्‍या या अधिकार्‍याची नंतर मालेगाव, नंदूरबार, धुळे आदी ठिकाणी बदली झाली. सध्या ते मुंबईच्या (वरळी) सशस्त्र दलाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असून परमबीर सिंग यांच्या पत्रातील नावाशी अथवा त्या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा दूरुनही संबंध नाही. संगमनेरातील छाप्यानंतर काही माध्यमांच्या वृत्तामुळे त्यांना मोठा मनःस्ताप झाला असून याबाबत त्यांनी स्वतः खुलासा करीत नावातील साधर्म्य असले तरी दोन्ही अधिकार्‍यांची पदे वेगळी असल्याकडे लक्ष्य वेधले आहे.

Visits: 13 Today: 1 Total: 118162

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *