फळपीक विमा योजनेसाठी शेतकर्यांना कृषी विभागाचे आवाहन मात्र कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी करता येणार अर्ज
नायक वृत्तसेवा, नगर
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हवामानावर आधारित फळपीक विमा योजना शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा खात्रीचा पर्याय झाला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गंत राज्याच्या कृषी विभागाकडून पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते. 15 जूनपासून विविध फळपिकांचा मृगबहार सुरू होत आहे. या पिकांसाठी शेतकर्यांनी विमा संरक्षण घेऊन खात्रीशीर नुकसान भरपाई मिळवावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकर्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतकर्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ ह्या उद्देशाने ही योजना राबविली जाते. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना राबविण्यात येते. सन 2020-21 पासून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्वीकारणे क्रमप्राप्त आहे.
या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून 35 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकर्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंब, डाळिंब व द्राक्ष) केवळ उत्पादनाक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. यासाठी या योजनेत अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय वर्षे ठरविण्यात आले आहे. यात पेरू-3, चिकू-5, संत्रा-3, मोसंबी-3, डाळिंब-2, लिबू-4, द्राक्ष-2, आंबा-5, काजू-5, सीताफळ-3 वय वर्ष उत्पादनक्षम वय ठरविण्यात आले आहे.
मृग बहार 2022-23 साठी डाळींब फळासाठी प्रतिहेक्टरी 6500 रुपये हप्त्यात 1 लाख 30 हजार रुपये विमा सरंक्षण 15 जूलै ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी 14 जुलै, 2022 पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. मोसंबी फळासाठी प्रतिहेक्टरी 4000 रुपये हप्त्यात 80 हजार रुपये विमा सरंक्षण 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीसाठी आहे. यासाठी 30 जून, 2022 पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. चिकू फळासाठी प्रति हेक्टरी 3000 रुपये हप्त्यात 60 हजार रुपये विमा सरंक्षण 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी 30 जून, 2022 पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. सीताफळ फळासाठी प्रतिहेक्टरी 2750 रुपये हप्त्यात 55 हजार रुपये विमा सरंक्षण 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी आहे. यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत विमा रक्कम भरणा करण्याची अंतिम तारीख आहे.