‘कुटे हॉस्पिटल अॅण्ड लॅप्रोस्कोपी सेंटर’मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
‘कुटे हॉस्पिटल अॅण्ड लॅप्रोस्कोपी सेंटर’मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया
महिलेच्या मूत्रपिंडातून विविध आकारांचे तब्बल 165 खडे काढले बाहेर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील नवीन नगर रस्त्यानजीक असणार्या ‘कुटे हॉस्पिटल अॅण्ड लॅप्रोस्कोपी सेंटर’मध्ये नुकतीच एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मूत्रपिंडातून (किडणी) तब्बल 165 विविध आकारांचे खडे काढून महिलेला नवसंजीवनी दिली दिली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती उत्तम असून ही शस्त्रक्रिया दुर्मिळातील दुर्मिळ व तितकीच किचकट असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध शल्यविशारद डॉ.प्रदीप कुटे यांनी दिली.
![]()
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील एक 40 वर्षीय महिला पोटदुखीबाबतच्या उपचारांसाठी कुटे हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. अधिक त्रास होत असल्याने डॉ.प्रदीप कुटे यांनी विविध तपासणी केल्यानंतर महिलेच्या मूत्रपिंडात (किडणी) खडे असल्याचे त्यांना आढळून आले. मोठ्या संख्येने आणि विविध आकारांत खडे असल्याने डॉक्टरांनी महिलेस शस्त्रक्रियेसाठी तयार केले. अतिशय किचकट व धोकादायक शस्त्रक्रिया असल्याने डॉ.कुटे यांनी भूलतज्ज्ञ डॉ.सोनाली कुटे, यूरो सर्जन डॉ.नरसिंह माने, शरद अडसुरे, अजित दिघे, दीपक लावरे, ज्ञानेश्वर गडगे, नर्स सुरेखा यांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्या महिलेच्या मूत्रपिंडातून विविध आकारांचे तब्बल 165 खडे बाहेर काढले. महिलेची प्रकृती उत्तम असून लवकरच यशस्वी उपचारांती हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात येणार असल्याचेही डॉ.कुटे यांनी सांगितले. या दुर्मिळ शस्त्रक्रियेबद्दल डॉ.कुटे आणि त्यांच्या पथकाचे वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

