ज्येष्ठ नेते शरद पवारांची माजी खासदार वाकचौरेंनी घेतली भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली महत्त्वपूर्ण चर्चा
गोरक्षनाथ मदने, संगमनेर
राज्यात शिवसेनेतील आमदारांचा एक गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची वर्णी लागून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यानंतर पुन्हा वेगवान घडामोडी घडून राष्ट्रवादीचाही एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाला. यानंतरही राजकीय धुराळा शांत झालेला नसताना नवनवीन राजकीय घडामोडी उदयास येत आहेत. अशातच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून (उबाठा) शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यासाठी ते संपूर्ण मतदारसंघही पिंजून काढत आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहून मतदारांशी संवादही साधत आहे. याचबरोबर निष्ठावान शिवसैनिक व नवे शिवसैनिक यांची मोट बांधून मतदारांना जोडत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारसंघाची बांधणी पक्की व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली.
विद्यमान सरकार सत्तेत येण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका होती. काँग्रेस व शिवसेना यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले होते. जवळपास अडीच वर्ष सरकार चालवले. त्यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होवून शिवसेनेतील एक गट फुटून भाजपबरोबर गेला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. त्यानंतर ही धग विझत असतानाच राष्ट्रवादीचाही एक गट फुटून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाला. यामुळे सगळी राजकीय समीकरणे बदलून गेली.
परंंतु, शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आजही शिवसेनेला सोबत घेऊन राजकीय धोरणं आखत आहेत. अशातच काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व लक्षात घेऊन विजय सुकर करण्यासाठी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रवक्ते संदीप वर्पे, रोहित वाकचौरे, किरण खर्डे उपस्थित होते. यामुळे माजी खासदार वाकचौरे यांना मोठे बळ मिळणार असून, निवडणूक लढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे.
शिवसेनेकडून उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महाविकास आघाडीतील राजकीय नेत्यांना भेटून साखर पेरणी करत आहे. मध्यंतरी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचीही भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते.