हिंदू सणांच्या काळातही संगमनेरात गाईंच्या रक्ताचे पाट वाहतेच! आता अलकानगरमध्येही कत्तलखाना; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाचा छापा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोवंश जनावरांच्या बेकायदा कत्तलखान्यांचे शहर म्हणून बट्टा लागलेल्या संगमनेरातील गोवंश कत्तलखाने अव्याहत सुरु होतेच, मात्र आता हिंदू धर्मियांच्या पवित्र सणांच्या काळातही त्यात खंड पडला नसल्याचे समोर आले आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरची कारवाई झाली. त्यात चारशे किलो वजनाचे गोवंशाचे कापलेले मांस हस्तगत झाले. पोलिसांना पाहून रेहान गुलामनबी कुरेशी या निष्पन्न आरोपीसह अज्ञात दोघे पसार झाले. या तिघांवरही भारतीय दंडसंहितेसह प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित तरतुदींन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अलकानगरसारख्या भागातही आता कत्तलखाने उभे राहत असल्याचे वास्तव समोर येण्यासह ‘ते’ बंद असल्याचे पोलिसांनी निर्माण केलेले चित्रही आभासीच असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

संगमनेर शहरातील कत्तलखान्यांचा इतिहास खूप मोठा आणि लांबलचक आहे. शहराच्या एका भागात वसलेल्या मोठ्या संख्येतील कुरेशी समाजाचा हा पिढीजात व्यवसाय असल्याने बहुतेकांचा उदरनिर्वाहच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पूर्वी मर्यादित भागात चालणार्‍या या व्यवसायाची व्याप्तीही आता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी सरकारने राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला. मात्र तो करताना भाकड जनावरं आणि जर्शी गाईंच्या गोर्‍ह्यांचे काय करायचे याची कोणतीही तरतूद केली नसल्याने हा कायदाच फसला. एकवेळ शेतकरी देशी जनावराचा गोर्‍हा सांभाळतील, पण जर्शी गाईचा गोर्‍हा सांभाळणं म्हणजे त्याच्यासाठी बकासूर सांभाळल्यासारखे होईल. त्यासोबतच या व्यवसायात राज्यातील कुरेशी समाज मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. गोवंश जनावरांची कत्तल रोखताना त्याचा या समाजाच्या उदरनिर्वाहावर काय परिणाम होईल? याचा शासनाने विचारच केला नाही. त्यामुळे एकीकडे शेतकर्‍यांची अडचण आणि दुसरीकडे एका समुदायाचा पोटपाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने बेकायदा असूनही अशा कत्तलखान्यांना पूर्णतः पायबंद घालणे शक्य झाले नाही, आजवर झालेल्या शेकडो कारवाया हेच सांगत आहेत.

तीन वर्षांपूर्वी भारतनगर परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापा पडल्यानंतर संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांचा आवाका उघड झाला होता. हजारो निष्पाप गोवंश जनावरांना निर्दयीपणाने कापून साठवलेल्या जवळपास ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह ७३ जिवंत जनावरे, वाहतुकीसाठी वापरात असलेली चारचाकी वाहने, रोकड आणि डायर्‍या असं खूप काही ‘त्या’ कारवाईतून हाती लागले होते, त्यातून संगमनेरातील कत्तलखान्यांमागील वास्तव समोर येईल असे अपेक्षित असतांना ‘सत्य’ आजही अंधारातच आहे. त्यावेळी डायर्‍यांमधील नावांची केवळ चर्चा झाली होती, प्रत्यक्षात ते अधिकृतपणे कधीच समोर येवू दिले गेले नाही.

असा सगळा धावता इतिहास असलेल्या संगमनेरातील गोवंश कसायांनी हिंदू सणांचा आदर राखून यापूर्वी अनेकदा जनावरांच्या कत्तली बंद ठेवल्याची उदाहरणे आहेत. मात्र यावेळी या अलिखित परंपरेचे काहींनी उल्लंघन केल्याचे बुधवारी झालेल्या पोलीस कारवाईतून समोर आले. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी आपल्या दोघा कर्मचार्‍यांना अलकानगर परिसरात पाठवले. रात्री अकराच्या सुमारास झालेल्या या कारवाईच्या वेळी एका गल्लीत आडोशाला असलेल्या एका घरात काहीतरी संशयित हालचाली होत असल्याचे पोलिसांना दिसले. त्याची खातरजमा करण्यासाठी दोघेही तेथे जाताच त्याठिकाणी असलेल्या तिघांनी अंधारात धूम ठोकली. त्यातील एकाची ओळख रेहान गुलामनबी कुरेशी अशी पटवण्यात आली आहे.

यावेळी घराच्या पडवीत साठवून ठेवलेले ८० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो गोवंशाचे मांस पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रेहान गुलामनबी कुरेशी (रा.संगमनेर) याच्यासह अज्ञात दोघांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम २६९, ४२९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५ (क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईतून संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने कधीही बंद नसल्याचे सत्य उघड होण्यासह आता अलकानगर सारख्या परिसरातही ते फोफावत असल्याचे दिसत आहे. संगमनेरातील कत्तलखाने पूर्णतः बंद असल्याचा शहर पोलिसांचा दावाही पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने खोटा ठरवला आहे.


भारतीय संस्कृतीत दीपावलीच्या सणाला पौराणिक आणि धार्मिक असे दोन्हे महत्त्व आहे. एकीकडे समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या देवी लक्ष्मीचे पूजन, तर दुसरीकडे चौदा वर्षांचा वनवास संपवून आयोध्येत परतलेल्या प्रभू श्रीरामचंद्राचे दीप उजळून केले जाणारे स्वागत असे हे दुहेरी पर्व हिंदू धर्म दीपोत्सव म्हणून साजरा करतो. दिवाळीचा सण पाच दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. या सणाचा पहिला दिवस गोवत्स द्वादशी अर्थातच वसुबारसेने साजरा होतो. घरातील गोधनाची पूजा करुन गोडधोड अन्न खाऊ घालण्याच्या परंपरेने सुरु होणारा दिवाळसण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची गुंफन घालणार्‍या भाऊबीजेने संपतो. हिंदू धर्मात गाईंना खूप महत्व दिले गेले आहे. बैलालाही महादेवाचे वाहन म्हणून पाहण्याची पद्धत आहे. ही जनभावना लक्षात घेवून या कालावधीत गोवंश कत्तलखाने बंद राहणे आवश्यक होते, मात्र तसे घडणे दूरच तर चक्क ऐन भाऊबीजेच्या दिवशीच संगमनेरात गोवंशाच्या रक्ताचे पाट वाहिल्याचे दुर्दैवी चित्र बुधवारी रात्री बघायला मिळाले.

Visits: 335 Today: 1 Total: 1416264

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *