पठारभागात पाणबुडी मोटारी चोरट्यांचे लक्ष्य! पाच महिन्यांत सतरा पाणबुडी मोटारींची चोरी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच महिन्यांत शेतकर्‍यांच्या सतरा पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या असून अद्यापही मोटारी चोरणार्‍या चोरट्यांचा शोध लागला नसल्याने शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, घारगाव, हिवरगाव पठार, चिंचेवाडी सारोळेपठार, बोटा, केळेवाडी या गावांमधून शेततळे, विहीर, पाझर तलाव यांच्यामधून अज्ञात चोरट्यांनी पाणबुडी मोटारी चोरून नेल्या आहेत. तर केळेवाडीच्या पाझर तलावातून एकाच रात्री अकरा शेतकर्‍यांच्या बारा पाणबुडी मोटारी चोरी गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे मोटारी चोरी जावूनही काही शेतकर्‍यांनी गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे चोरट्यांचा आत्मविश्वास अधिक बळावला असल्याचे वरील घटनेवरुन लक्षात येते. या सततच्या चोर्‍यांमुळे शेतकरी अक्षरशः वैतागले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणबुडी मोटारी चोरी जावूनही अद्याप तरी एकाही पाणबुडी मोटारीचा शोध लागला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून पठारभागातील शेतकर्‍यांच्या पाणबुडी मोटारी अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केल्या आहेत. त्यातच कांदा काढणी सुरू असून, भावही नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. अशातच पाणबुडी मोटारी चोरीचा सिलसिला सुरूच राहिल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यामुळे घारगाव पोलिसांनी तत्काळ मोटारी चोरणार्‍या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Visits: 129 Today: 1 Total: 1110279

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *