गणेश तोरमल यांनी वडिलांची स्वप्नपूर्ती केली ः डॉ. लहामटे वीरगाव येथील नवसाच्या आखाडीने फेडले डोळ्यांचे पारणे

DIWALI ADS CVT.cdr

नायक वृत्तसेवा, अकोले
गणेश तोरमल यांनी खर्‍या अर्थाने वडिलांची नवसाच्या आखाडीची स्वप्नपूर्ती केली आहे. दिवाळी सण असतानाही मला या आखाडीचा मोह आवरता आला नाही. आणि इथे येऊन हा भव्य-दिव्य नयनरम्य सोहळा पाहून धन्य झालो, असे गौरवोद्गार अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काढले.

अकोले तालुक्यातील वीरगाव येथे गणेश तोरमल यांनी वडील स्वर्गीय गौराम पांडुरंग तोरमल यांच्या स्मरणार्थ अंबिका मातेच्या ‘नवसाच्या आखाडी’चे अत्यंत भव्य-दिव्य स्वरुपात आयोजन केले होते. आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांच्या आतिषबाजीने अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले. पारंपरिक सोंगांना नवी झळाळी देत सोंग घेतलेल्या कलाकारांनी देखील तितकाच जीव ओतून नाचकाम केले. रात्रभर झालेल्या या आखाडीचा पाहुणे, मित्रमंडळी व नातेवाईकांनी आनंद घेतला.

या आखाडीत देवीची मिरवणूक खास आकर्षण ठरली. नवसाची आखाडी असल्याने देवी घेण्याचा मान गणेश तोरमल यांना मिळाला. त्यात सनई चौघड्याबरोबर संगमनेरी तांडव ढोल ताशा ध्वज पथकाने आणखी रंगत भरली. गावातून देवीची मिरवणूक जाताना ठिकठिकाणी महिला भाविकांनी देवीचे औक्षण करून दर्शन घेतले. तर पुणे येथील रांगोळी काढणार्‍या महिला कलाकाराची कला पाहून सगळेच भारावून गेले. अवघ्या काही सेकंदात रांगोळी काढण्याची कला आचंबित करणारी होती. शेवटी तोरमल परिवाराच्यावतीने सहभागी सगळ्या घटकांचा यथोचित सन्मान करून आभार मानण्यात आले.

Visits: 216 Today: 1 Total: 1917218

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *