राहुरीमध्ये मयत भाऊ जिवंत दाखवून जमीनीची विक्री उपनिबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरुन सहा जणांवर गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, राहुरी
मयत झालेल्या भावाच्या जागेवर दुसरा भाऊ उभा करुन जमिनीची विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राहुरीतून समोर आला आहे. याप्रकरणी जमीन विक्री करणारे, खरेदी घेणारे आणि त्या व्यवहाराला साक्षीदार असणारे व ओळख देणार्‍यांच्या विरोधात राहुरी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सीमा रोहिदास धस (रा.घाटकोपर, मुंबई) या महिने एक वर्षापूर्वी राहुरी दुय्यम निबंधक कार्यालय व पोलिसांत तक्रार अर्ज दिलेला होता. त्यात म्हटले होते की, तालुक्यातील पिंप्री अवघड येथील शेतजमीन गट क्रमांक १२७ मधील ०.२७ गुंठे ही भानुदास रखमाजी धस यांच्या नावावर होती आणि ते ७ जुलै, २००५ रोजी मुंबई येथे मयत झालेले असताना सदर जमीन ही त्यांचा भाऊ रामदास रखमाजी धस याने भानुदास रखमाजी धस भासवून ३१ जानेवारी, २०११ रोजी उपनिबंधक कार्यालयात हजर राहून खरेदी घेणारा ठकसेन नरहरी कांबळे (रा. पिंप्री अवघड) याने १ लाख ५० हजार रुपयांत खरेदी केली.

खरेदीच्या वेळी रामदास धस हेच भानुदास धस आहेत याबाबत विजय बाळकृष्ण कांबळे आणि अशोक माधव पिंगळे (रा. पिंप्री अवघड) या दोघांनी ओळख म्हणून सह्या दिल्या. तसेच खरेदीखताच्या वेळी साक्षीदार म्हणून विनायक ठकसेन कांबळे आणि सुभाष तुकाराम गायकवाड (रा. देवळाली प्रवरा) यांनी सह्या केल्या आहेत. दरम्यान, तक्रार अर्जाची चौकशी झाली असता वरील आरोपींनी संगनमत करुन मयत भावाऐवजी जिवंत भाऊ उभा करुन जमीन खरेदी करुन शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यावरुन उपनिबंधक प्रवीण कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ठकसेन कांबळे, रामदास धस, विजय कांबळे, अशोक पिंगळे, विनायक कांबळे, सुभाष गायकवाड या सहा जणांवर भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Visits: 133 Today: 1 Total: 1102726

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *