ग्रामपंचायतचा शिपाई झाला गावचा लोकनियुक्त सरपंच! आश्वी बुद्रुकच्या सरपंचपदी नामदेव शिंदे झाले विराजमान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामपंचायतीत अनेक वर्षे पाणी पुरवठा विभागात शिपाई म्हणून काम केले, त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून काम करण्याचा मान मिळाला आहे. ही गोष्ट आहे संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील.

आश्वी ग्रामपंचायतचे सरपंचपद यंदा राखीव झाल्याने मिळालेली संधी आणि नागरिकांनी धरलेला आग्रह पाहता पाणी पुरवठा विभागातील शिपायाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि थेट सरपंचपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. नागरिकांचा असलेला उत्स्फूर्त पाठिंबा, यामुळे त्यांनी घवघवीत मते मिळवत सरपंचपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला.

तसे पाहिले तर हे गाव माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर तालुक्यातील आहे. तर विधानसभेला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता विधानसभा मतदारसंघात येते. या ग्रामपंचायतमध्ये नामदेव किसन शिंदे हे पाणी पुरवठा विभागात शिपाई म्हणून गेली ४० वर्षे काम करत होते. मात्र, यंदा ग्रामपंचायतला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण पडले आणि त्यामुळे साहजिकच या प्रवर्गात येत असल्याने नामदेव शिंदे यांना गावातील नागरिकांनी सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह केला.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे नामदेव शिंदे यांनी ग्रामपंचायतीतील नोकरीचा राजीनामा देत त्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात प्रणित अमरेश्वर ग्रामविकास मंडळाकडून नामदेव शिंदे यांनी आपली उमेदवारी दाखल केला. मात्र, उमेदवारी दाखल करण्यापूर्वी गेली ४० वर्षे ते याच ग्रामपंचायतीमध्ये गावाला पाणी पुरवठ्याचं काम करत होते. त्या शिपाई पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, ४० वर्षे गावाला पाणी पुरवठ्याचं काम करून केलेली ग्रामसेवा ही मतदारांना भावली होती आणि त्यामुळेच त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा चंग बांधला आणि निवडणूक निकालानंतर नामदेव शिंदे हे आश्वी बुद्रुकचे सरपंच झाले. ज्या ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून काम केलं, त्याच ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून बसण्याचा मान त्यांना आता मिळाला आहे. या निकालानंतर स्वतः आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरपंच झालेल्या नामदेव शिंदे यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

‘कधीही गावचा सरपंच होईल असं स्वप्नातही आलेले नव्हते. मात्र, यंदा अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडले आणि त्यानंतर गावातीलच नागरिकांनी मोठा आग्रह केला आणि त्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. या विजयाचे मानकरी सर्व गावकरी आहेत. आता यापुढे सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करू.’
– नामदेव शिंदे (लोकनियुक्त सरपंच)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *