जयहिंद महिला मंचकडून सैनिकांच्या कुटुंबियांना फराळ दरवर्षी राबविणार्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र होतेय कौतुक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशवासीयांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देत असलेल्या संगमनेर तालुक्यातील भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांना काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद महिला मंचच्या भगिनींकडून दिवाळीनिमित्त दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले. दरवर्षी राबविण्यात येणार्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संगमनेर येथील यशोधन संपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज सैनिक कल्याण संस्था यांच्यावतीने तालुक्यातील आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकाश कोटकर, अर्चना बालोडे, वीरमाता अलका रहाणे, शीला करंजकर, सुनीता कांदळकर, सौदामिनी कान्होरे, रोहिणी कोटकर, अनुराधा आहेर, सुनीता रहाणे, पुष्पा कोल्हे, सपना पावसे, शीला उगलमुगले, संस्थापक भानुदास कोटकर, सुभाष कोटकर, सुनील थोरात, प्रवीण गुंजाळ, भारत कुटे, संजय अभंग, गिरीश एरंडे, संजय रहाणे, शिवाजी रहाणे, विक्रम थोरात, आनंद गिते, शशिकांत कोटकर, लक्ष्मण ढोले, भास्कर सातपुते, सोमनाथ गुंजाळ, शांताराम गोरे, माधव काकड, मेजर घुले, बाळू सातपुते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अर्चना बालोडे म्हणाल्या, भारतीय सैनिक हे कायम आपल्या परिवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कर्तव्यावर असतात. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. ते दिवाळी किंवा सणांना कुटुंबियांसोबत नसतात म्हणून त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना दुर्गा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील बचत गट, महिला मंडळ यांच्याकडून सैनिकांना दिवाळीनिमित्त विविध फराळाचे पदार्थ उच्च प्रतिच्या पॅकिंगमध्ये त्यांच्या कुटुंबियांना दिले आहेत. या अभिनव उपक्रमात तालुक्यातील अनेक कुटुंबही सहभागी होणार आहे.
