गावाच्या राजकारणात आठ विद्यार्थी शाळाबाह्य! जवळे कडलगमधील प्रकार; अचानक पाचवीचा वर्ग बंद केला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासन निर्णयाचा आधार घेवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलाच पाचवीचा वर्ग संलग्न करण्याची मागणी जवळे कडलग येथील पालकांनी अर्जाद्वारे केली होती. त्यावर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पाचवीचा वर्ग सुरु केल्याचा अभिप्रायही नोंदविला. त्यानंतर तीन महिने तब्बल ३२ विद्यार्थ्यांसह वर्गही सुरु राहिल्यानंतर अचानक शिक्षक दिनीच पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी शाळेला पत्र देवून वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. चोवीस विद्यार्थ्यांनी गावातीलच दुसर्या शाळेत प्रवेश घेतला, मात्र आठ विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा परिषदेतच मुलं शिकवण्याचा हट्ट धरल्याने गेल्या सप्टेंबरपासून जिल्हा परिषद जवळे कडलगच्या आठ गुणी विद्यार्थ्यांवर शाळाबाह्य होण्याची वेळ आली आहे. शिक्षणाच्या कायद्याने एकीकडे पटसंख्येकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलेले असताना दुसरीकडे पंचायत समितीने त्यावरच बोटं ठेवून पाचवीच्या वर्गाची मान्यता मागे घेतल्याने या एकूण प्रकारातून स्थानिक राजकारणाचा वास येवू लागला आहे. मात्र त्यामुळे आठ गुणी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याकडे कोणाचेही लक्ष्य नसल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर अभ्यास करता करता आंदोलन करणार्या आठ विद्यार्थ्यांच्या चेहर्यातून बघायला मिळत आहे.

आढळा नदीच्या पाण्याने सुजलाम् असलेल्या तालुक्यातील जवळे कडलगची ओळख फळबागांचे गाव म्हणूनही होते. डाळींब, द्राक्षांचे आगार असलेले हे टुमदार गाव तसे राजकारणातही अजिबातच मागे नाही. त्यामुळे गावात विकासासोबतच राजकारणाचेही पूल नेहमीच बांधले आणि पाडले जातात. त्याचा अनुभव यापूर्वीही आलेलाच आहे. यावेळी मात्र स्थानिक राजकारणातून चक्क शिक्षणाच्याच आईचा घोऽ करण्याचा प्रकार समोर आला असून त्यात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिकाही दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वर्गाच्या मान्यतेवरुन सुरु असलेली धुसफूस आता थेट शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर पोहोचली असून सोमवारपासून स्थानिक राजकारण आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांचा हलगर्जीपणा यामुळे इच्छा असूनही शाळाबाह्य झालेल्या आठ विद्यार्थ्यांना पाठ्यापुस्तकांसह उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे.

याबाबत दैनिक नायकला मिळालेल्या माहितीनुसार जवळे कडलग येथील जवळपास ३२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेला जूनमध्ये दिलेल्या अर्जातून पाचवीचा वर्ग संलग्न करण्याची विनंती केली होती. त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना पाचवीचा वर्ग संलग्न करण्याबाबत झालेल्या शासन निर्णयाचाही दाखला देण्यात आला होता. त्यानुसार शाळेने जूनपासून जवळे कडलग जिल्हा परिषद शाळेत पाचवीचा वर्ग सुरु केला आणि पुढील जवळपास तीन महिने तो सुरुही राहीला. या वर्गात ३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र ५ सप्टेंबर रोजी ऐन शिक्षक दिनीच पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाची पटसंख्या कमी असल्याने कारण देत सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना तशा सूचना देण्यास सांगितले.

गटविकास अधिकार्यांच्या या निर्णयानंतर जवळपास २४ पालकांनी आपल्या पाल्यांना गावातील बहुजन शिक्षण प्रसारक संस्थेच्या दत्त विद्यालयात दाखल केले. मात्र आठ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमची मुलं याच शाळेत पाचवीचे शिक्षण घेतील असा आग्रह धरीत त्यांचे दाखले मागे घेतले नाहीत. मुलेही नियमितपणे गणवेश घालून शाळेत जात होती, मात्र मागील सप्टेंबरपासून या आठही मुलांना कोणताही शिक्षक शिकवत नसून सदरची मुलं फक्त शाळेत जातात आणि आवारातच झाडाखाली बसून अभ्यास करतात व शाळा सुटल्यावर घरी येतात. हा प्रकार शासनाच्या शिक्षण धोरणाची अक्षरशः वाट लावणारा असून शिक्षणाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. या प्रकरणात वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून सदरील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.

नव्याने चौथीनंतर पाचवीचा वर्ग संलग्न करणार्या जिल्हा परिषद शाळांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जावून प्राप्त झालेल्या सांकेतिक क्रमांकाचा वापर करीत पाचवीत प्रवेश घेणार्या मुलांची नोंद करणे अनिवार्य आहे. जवळे कडलग येथील शाळेलाही शिक्षण विभागाने तसा सांकेतिक क्रमांक दिला होता. मात्र शाळेने त्याचा वापरच न केल्याने तीन महिने वर्ग चालूनही त्यात शिक्षण घेणार्या तब्बल ३२ विद्यार्थ्यांची नोंदच झाली नाही. त्यामुळेच शासनाने शाळेला दिलेली पाचवीच्या वर्गाची मान्यता रद्द केल्याचे बोलले जाते. असे असल्यास त्यात मुख्याध्यापकांचा हलगर्जीपणाही ठळकपणे दिसून येतो. त्यामुळे शासनाने या धक्कादायक प्रकाराची गांभीर्याने नोंद घेवून त्याची सखोल चौकशी आणि कारवाई करण्याची गरज आहे.

