राज्यातील आघाडी सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोर’! भाजप नेते किरीट सोमय्या यांची शिर्डीत पत्रकार परिषद; मंत्री तनपुरे यांच्यावरही गंभीर आरोप
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्री व नेत्यांविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेवून भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. आज शिर्डीत दाखल झालेल्या सोमय्या यांनी साईबाबांच्या दर्शनानंतर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या असून यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख ‘अलीबाबा चाळीस चोर’ असा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही घणाघाती हल्ला केला आहे. ‘पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लाखो शेतकर्यांचे सहकारी साखर कारखाने गिळले, असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.

किरीट सोमय्या यांनी आज (ता.20) शिर्डीत येत साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त व्हावा अशी प्रार्थना आपण साईंच्या चरणी केल्याचे सांगितले. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणार्या साईबाबांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार्यांचे मुखवटे फाडण्याच्या आपल्या कामाला आणखी गती प्राप्त होईल असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना त्यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राम गणेश गडकरी साखर कारखाना बेनामी पद्धतीने घेतला. तसेच या कारखान्याची जमीन माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना हस्तांतरित केली. या मागील नेमके गौडबंगाल काय आहे? असा सवाल करीत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच त्यातील धक्कादायक सत्य समोर येईल असे सांगितले. दरम्यान मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘माझ्या घरी ईडीची धाड पडणार आहे. केंद्रीय यंत्रणांनी माझ्या विरोधात कारवाई करावी म्हणून देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत आहेत’ असं ट्वीट केल्याचे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणले असता, ‘मालाचा हिशोब घेण्यासाठी कोणी घरी येईल का? याची भीती मलिकांना वाटतं असेल. ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर कारवाई होणारच आहे’ असे सोमय्या म्हणाले.

यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही घणाघाती आरोप करताना ठाकरेंचे मंत्रीमंडळ म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे’ असे ते म्हणाले. या टोळीतील एकजण शंभर कोटीच्या वसुली प्रकरणात तुरुंगात आहे. दुसरा कार्यकर्त्यांचे अपहरण करतो म्हणून जामिनावर आहे. आनंदराव अडसूळ यांच्यावर 980 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी वॉरंट निघाले असून साडेतीन महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत. परिवहन मंत्री अनिल परब बेकायदेशीर रिसॉर्ट बांधण्यात व्यस्त आहेत. केवळ मुख्यमंत्रीच घरी बसले आहेत असं नाही तर या सरकारचे सगळेच मंत्री कोमामध्ये गेले आहेत. सगळे मंत्री पैसे मोजण्यातच व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. न्यायालयाच्या आशीर्वादानं राज्यात कारवाई सुरु आहेत आणि त्यातून पैसे जप्त करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
