चिंचावणेत 75 तरुणांनी गोटा उचलून फेडला नवस अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम; आमदार लहामटेही यात्रेत सहभागी


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील चिंचावणे गावात वेताळबाबा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली असून मारुती मंदिरासमोर 160 किलोचा गोटा उचलून 75 तरुणांनी होळीच्या भोवती फेरा मारून आपला नवस फेडला. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उपस्थिती दाखवून यात्रेत आपला सहभाग नोंदविला. तर राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून यात्रा शांततेत पार पाडली.

गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत आदिवासीबहुल चिंचावणे गावात वेताळबाबांची यात्रा आदिवासी लोक होळीच्या दुसर्‍या दिवशी पार पाडतात. शेकडो वर्षांपूर्वीचा 160 किलोचा मोठा गोटा उचलून आपला नवस फेडण्यासाठी अनेक भाविक भक्त येथे उपस्थित होतात. गावातील चाकरमानी लोक यादिवशी गावी येतात. सकाळी गावात मारुती मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली. त्यावेळी गोट्याची विधीवत पूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता मंदिरासमोर मोठी गर्दी झाली आणि त्यावेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील भक्त गोटा उचलण्यासाठी सज्ज झाले. अंगात ताकद असलेल्या तरुण पैलवानांनी एकेक करत बोल वेताळबाबा की जय, जय अंजनीसूत हनुमान की जय असा गजर करत गोटा उचलला. यावेळी महिलांनी विजयी पैलवानांचे औक्षण करून पुजार्‍याला दक्षिणा दिली.

गावातील लोक व यात्रेसाठी उपस्थित असणारे भाविक पायात चप्पल घालत नाही. नियम मोडल्यास यात्रा समिती दंड करते. त्यामुळे भर उन्हात पायला चटके बसत असेल तरी श्रद्धाळू अनवाणी पायांनी सहभाग झाले होते. यादिवशी प्रत्येकाच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला होता. आलेल्या पाहुण्यांना आग्रहाने जेवू घातले. यावर्षी होळीचा सण आदिवासी भागात उत्साहात साजरा केला. शिवाय अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान करुनही यात्रेत आपले दुःख कोणीही दाखविले नाही हे विशेष.

सालाबादप्रमाणे यावर्षी वेताळबाबांची यात्रा उत्साहात साजरी झाली. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 75 तरुणांनी 160 किलोचा गोटा उचलून आपली श्रद्धा व्यक्त केली.
– अलका डगळे (सरपंच, चिंचावणे)

Visits: 42 Today: 1 Total: 437175

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *