खांडगाव अत्याचार प्रकरणात आता जादुटोणा विरोधी कायदा! भोंदुबाबाच्या मुसक्या आवळल्या; मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दारुच्या व्यसनात डूंबलेल्या पतीला त्यातून बाहेर काढण्यासाठी भोंदुगिरी करणार्‍या बाबावर विश्वास ठेवून त्याच्यासोबत नदीपात्रात गेलेल्या व त्या भोंदुबाबाच्या वासनेचा बळी ठरलेल्या प्रकरणाला आता नवा अध्याय जोडला गेला आहे. विजयादशमीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेनंतर पसार होवून परिसरातील डोंगरांमध्ये दडलेल्या सोमनाथ उर्फ पप्पू गणपत आव्हाड या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले असून त्याच्या चौकशीतून तो अंगारे-धुपारे करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात आता अत्याचारासह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे कलम तीनही आता समाविष्ट करण्यात आले आहे. अटक केलेल्या भोंदुबाबाला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून त्याने अशा पद्धतीने आणखी कितीजणांची फसवणूक केली याचा शोध लागण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता.२४) ऐन विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात सदरची घटना घडली होती. परिसरात राहणार्‍या एका ४५ वर्षीय विवाहित महिलेच्या पतीला दारुचे व्यसन जडल्याने त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी सदर महिलेने सोमनाथ आव्हाड या भोंदुगिरी करणार्‍या बाबाला पाचारण केले होते. त्याने विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी पीडितेच्या घरी येवून पतीची दारु सोडवण्यासाठी काही विधी करावे लागतील असे सांगत सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेला खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात नेले. यावेळी तिच्यासोबत तिचा पतीही होता, मात्र त्याला काही अंतरावर थांबवून आधीच मनातील रावण जिवंत झालेल्या भोंदुबाबाने पीडितेला एकटीलाच पात्राकडे नेले.

सुरुवातीला नारळ व लिंबाची पूजा करण्याचे नाटक करुन त्याने विवाहितेला विवस्त्र होण्यास सांगितले. त्याच्यावर भरवसा ठेवून पीडितेने तशी कृती करताच त्या नराधमाने अंधाराचा फायदा घेत तिला जमिनीवर खाली पाडले आणि काही समजण्याच्या आतच तिच्या अब्रुला हात घातला. दरम्यानच्या काळात त्याने पीडितेला हिप्नोटाईज केल्याने नेमकं काय घडतंय हे तिला समजलंच नाही. आपला कार्यभाग उरकताच भोंदुबाबा तेथून पसार झाला. त्याच्या पावलांच्या आवाजाने सावध झालेल्या पीडितेच्या पतीने त्यानंतर पात्रात जावून पाहिले असता सदरचा प्रकार उघड झाला. या प्रकरणाची परिसरात वाच्यता झाल्याने जमलेल्या नागरिकांनी ‘त्या’ भोंदुला पकडून यथेच्छ बडवले, मात्र त्यांच्या हातातून सुटका करुन घेत त्याने जी धूम ठोकली ती पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कायम होती.

बुधवारी (ता.२५) रात्री तांत्रिक विश्लेषणावरुन पसार असलेला भोंदुबाबा सोमनाथ आव्हाड हा खांडगाव नजीकच्या डोंगरांमध्ये असल्याचे समोर आल्यानंतर तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी फौजफाट्यासह छापा घालीत त्याच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी रात्री त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या घरझडतीमध्ये भोंदुगिरीसाठी लागणारे साहित्यही आढळून आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्याच्यावर दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यात आता महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करणार्‍या कायद्याचे कलम तीन नुसार वाढीव कलम लावले आहे. आज (ता.२६) त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला मंगळवार ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून यापूर्वी त्याने अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? याचाही शोध घेतला जाणार आहे. 

अत्याचार प्रकरणातील आरोपी सोमनाथ उर्फ पप्पू आव्हाड (वय ३२, रा.राजापूर रोड, खांडगाव) याच्या अंगात कोणा देवीचा संचार होत असल्याचे त्याने गावातील लोकांना भासवले. ठराविक दिवशी त्याच्या अंगात आलेली हवा पीडित असलेल्या माणसांना उपाय सांगत असत. याच कारणाने अत्याचार झालेल्या पीडितेचे कुटुंब त्याच्या संपर्कात आले आणि त्यातून हा अनर्थ घडला. या प्रकाराने आजच्या विज्ञान युगातही माणसं अंधश्रद्धेच्या आहारी जावून नको ते उद्योग करीत असल्याचे वास्तवही ठळकपणे समोर आले आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 30106

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *