संगमनेरच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोधाची धुगधुग कायम! स्थानिकांची समजूत घालण्यात अपयश; लोकार्पण सोहळ्यातच फ्लेक्स झळकावण्याचा अयशस्वी प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आधुनिक शहरांच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या संगमनेर शहरासाठी अतिशय महत्त्वकांक्षी ठरणार्‍या आणि त्यामुळे जल प्रदूषण कमी होणार्‍या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला खीळ घालण्याचा घाट सध्या सुरु आहे. गेल्या वर्षभरापूर्वी या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन केले होते. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेला असताना गेल्या आठवड्यात पालिका प्रशासनाने अचानक जोर्वेनाक्यावरील नियोजित प्रकल्पाच्या जागेवरील अतिक्रमणे हटविली. यावेळी किरकोळ अपवाद वगळता विरोध न झाल्याने या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचे वाटत असतांना रविवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झालेल्या लोकार्पण सोहळ्यातच विरोधाचा सूर आळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पालिकेने पोलिसांच्या मदतीने तत्पूर्वीच तो मोडून काढल्याने सय्यदबाबा चौकातील लोकार्पण सोहळा शांततेत पार पडला.

प्रगल्भ ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संगमनेर शहरात गेल्या काही दशकांपासून मोठे बदल झाले आहेत. शहरी नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. कधीकाळी क्लोजरच्या (आवर्तन नसलेला काळ) काळात संगमनेरकरांना हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र गेल्या दशकांत आपले मंत्रीपद खर्ची करुन बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहरासाठी थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन आणली आणि संगमनेरकरांचा पाण्यासाठीचा वर्षोनुवर्षाचा संघर्ष संपला. याच कालावधीत शहराच्या वैभवात भर घालणार्‍या विविध शासकीय इमारती, बसस्थानक, उद्याने आणि चकचकीत रस्ते तयार झाले. त्यातून प्राचीन असलेल्या संगमनेर शहराला आधुनिकतेचा साज चढला. विकासाची ही घोडदौड कायम असतांना सुमारे शंभर कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पही त्यात सहभागी होण्यासाठी तत्पर झाला, मात्र स्थानिकांच्या विरोधाने वर्षभर त्याला चाप बसला.

वास्तविक संगमनेर शहरात सांडपाणी वाहून नेण्यासाठी जुन्या धाटणीतल्या गटारींचे जाळे पसरलेले आहे. महाराष्ट्रात अभावाने दिसणार्‍या या भूमिगत गटारांची तोंडं मात्र थेट प्रवरा नदीपात्रात उघडत असल्याने शहरातील बहुतेक सांडपाणी प्रवेरच्या शुद्ध पाण्यात मिसळले जात होते. त्यातच भारतनगर, जमजम कॉलनी, रहेमतनगर, मोगलपुरा या परिसरातील अनधिकृत गोवंश कत्तलखान्यांमधील जनावरांचे रक्त व घाण पाणीही या गटारांमधून थेट नदीत पोहोचत होते. त्याचा परिणाम प्रवरानदी पात्रात असलेल्या पाणी पुरवठ्याच्या विहिरींमध्ये हे घाण पाणी मिसळून ग्रामीण भागातील अनेक गावांचे जलस्रोत दूषित बनले होते. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने व त्यातून विरोधही झाला. मात्र पालिकेकडे सांडपाणी साठवण्यासाठी अथवा त्याचा पुनर्वापर करण्यासाठी कोणतीही योजना नसल्याने गेली दशको न् दशके हा प्रकार बिनबोभाटपणे सुरुच होता.

या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषदेने गेल्या वर्षभरात शहरातील जुन्या भूमिगत गटारांचे मजबुतीकरण करुन संपूर्ण शहराच्या विविध भागातून जमा होणारे सांडपाणी एकाच ठिकाणी आणून त्यावर प्रक्रिया करणार्‍या प्रकल्पाची संकल्पना समोर आणली. त्यासाठी 98 कोटी रुपयांचा निधीही मिळवला. सुरुवातीला भूमिगत गटारी आणि सांडपाणी प्रकीया प्रकल्पाचे काम सोबत सुरु करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यासाठी जोर्वेनाक्याजवळील पालिकेच्या मालकीच्या दोन एकर भूखंडाची जागा निश्चित करुन तेथील अतिक्रमण हटविण्याचीही योजना आखण्यात आली. मात्र त्यावेळी स्थानिकांनी मोठ्या संख्येने एकत्रित येवून त्याला विरोध केल्याने पालिकेच्या पथकाला कोणत्याही कारवाईशिवाय माघारी फिरावे लागले होते. त्यामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळल्या गल्याची चर्चा मागील वर्षभरापासून सुरु होती.

मात्र गेल्या आठवड्यात पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी स्थानिकांचा विरोध डावलून मोठ्या फौजफाट्यासह या भूखंडावरील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यावेळीही किरकोळ स्वरुपाचा विरोध झाला, मात्र पालिकेच्या पथकासोबत पोलिसांचा फौजफाटा असल्याने तो मोडून काढण्यात पालिका आणि पोलिसांना यश आले. त्यानंतर दिवसभर या भूखंडाच्या सपाटीकरणाचे काम सुरु असतानाही त्याला विरोध न झाल्याने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा बाजूला सारला गेल्याचे चित्र निर्माण झालेले असताना रविवारी मात्र या प्रकल्पाच्या विरोधातील धग असूनही धुगधूगत असल्याचे दिसून आले.

गेल्या वर्षभरात पालिकेने शहरात केलेल्या विविध विकासकामांसह प्रवराकाठ सुशोभीकरणाचा भूमिपूजन सोहळा रविवारी (ता.22) आयोजित करण्यात आला होता. ट्रीमिक्स पद्धतीने बनविलेल्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाचा लोकार्पण सोहळा सय्यदबाबा चौकात झाला. या कार्यक्रमासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक व अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचा अंदाज येताच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी न बोलता आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोवण्याची नामी शक्कल लढवली. ऐन कार्यक्रमाच्या जवळच एक मोठा फ्लेक्स लावण्यात आला.

त्यावर ‘संपूर्ण शहराचे घाण व गटारीचे दूषित पाणी जोर्वेनाका, रहेमतनगर, डाके मळा, डोंगरे मळा, नायकवाडपुरा, लखमीपुरा, परदेशपुरा, देवीगल्ली या परिसरात एसटीपी प्लँट उभारुन लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे व संपूर्ण हुशार नगरसेवक व नगरसेविका यांचे जाहीर आभार’ असा उपहासात्मक मजकूर लिहिण्यात आला होता. हा फलक ऐन कार्यक्रमाच्या आसपास लावण्यात आल्याने परिसरात खळबळही उडाली होती. याबाबतची माहिती मिळताच मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला त्या फ्लेक्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईला विरोध होणार हे माहिती असल्याने त्यासाठी पोलिसांनाही पत्र देवून आवश्यक तो बंदोबस्त देण्यास सांगण्यात आले होते.

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्यासह पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने रविवारी दुपारीच सय्यदबाबा चौकात जावून सदरचा फ्लेक्स बेकायदेशीर असल्याचे सांगत जप्त केला. यावेळी काहींनी शाब्दिक विरोध करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या समोर तो फारकाळ तग धरु शकला नाही. त्यामुळे सायंकाळी सय्यदबाबा चौकात होणारा लोकार्पण सोहळा कोणत्याही अडथळ्याशिवाय निर्विघ्नपणे पार पडला आणि पालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. एकंदरीत या प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिक नागरिकांना हा प्रकल्प कसा चांगला आहे, त्यातून दुर्गंधी सारख्या गोष्टी घडणार नाहीत. आधुनिक मशिनरीचा वापर करुन उभा राहणारा हा प्रकल्प संगमनेरच्या विकासात मैलाचा दगड ठरु शकतो, यापूर्वी अशाच आधुनिक संसाधनांचा वापर करुन संगमनेर खुर्दमधील पालिकेचा कंपोष्ट खताचा प्रकल्पही दुर्गंधीमुक्त करण्यात आला आहे हे पटवून देण्यात स्थानिक नगरसेवकांपासून नगराध्यक्षांपर्यंत सर्वच जण अपयशी ठरल्याने बळाचा वापर करुन या प्रकल्पाचा विरोध मोडून काढला असला तरीही त्याची धगधग मात्र अजूनही कायम असल्याचे या घटनेतून दिसून आले.

Visits: 100 Today: 1 Total: 1098484

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *