छत्तीसगडमधून आणलेला दहा किलो गांजा कोपरगावमध्ये पकडला ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; पोलिसांची संयुक्त कारवाई


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
छत्तीसगड राज्यातून कोपरगावमध्ये विक्रीकरीता आणलेला १० किलो गांजा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. या कारवाईत ३ मोबाईल, एक विना क्रमांकाची मोटारसायकल असा ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तीन आरोपींना जेरबंद केले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध धंदेचालकांत एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, रवींद्र पांडे, सचिन अडबल, संतोष खरे, संभाजी कोतकर यांचे विशेष पथक स्थापन करुन बेकायदेशीर अंमली पदार्थ वाळगणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

पथकातील अधिकारी व अंमलदार असे शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणार्‍या इसमांची माहिती काढत असताना पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत अजीम कुरेशी (रा. कोपरगाव) व त्याचे दोन साथीदार असे विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून कोपरगावातील साई कॉर्नर येथे अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी घेवून येणार आहेत अशी बातमी मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे जावून पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना बातमीतील हकीगत सांगून छाप्याचे नियोजन केले.

पोलीस निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, गणेश काकडे, राम खारतोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी साई कॉर्नर येथे सापळा रचून त्यांना थांबविले. हकीगतीमधील वर्णनाची मोटारसायकल व त्यावर तिघेजण येताना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यातील अजीम जाफर कुरेशी, वाजिद कलीम कुरेशी व सुलतान रमजान अख्तर (तिघेही रा. संजयनगर, कोपरगाव) यांची झडती घेतली असता १० किलो गांजा, ३ मोबाईल, विनाक्रमांकाची मोटारसायकल असा एकूण ३ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी गांजा कोठून आणला याची विचारपूस केली असता त्यांनी गांजा हा तौफिक तांबोळी (इदगाह फाटा, लाकेनगर, रायपूर, छत्तीसगड) याच्याकडून आणला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पोहेकॉ. दत्तात्रय गव्हाणे यांनी कोपरगाव शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. ५०३/२०२३ गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन १९८५ चे कलम ८ (क) सह २० (क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख हे करत आहे.

Visits: 21 Today: 2 Total: 112944

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *