दिवाळीच्या खरेदीसाठी आता संगमनेरात ‘फुलझडी’ खरेदी मेळा! इनरव्हील व रोटरी क्लबचा उपक्रम; सणासाठी लागणार्‍या सर्व वस्तू एकाच छताखाली..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील फॅशन मॉल्स व बाजारपेठा सज्ज होत असतांना त्याची झलक आता संगमनेरातही बघायला मिळणार आहे. सामाजिक क्षेत्रात कामाचा प्रचंड आवाका असलेल्या इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लब या दोन संस्थांनी संगमनेरकरांच्या मनातील दिवाळी साजरी होण्यासाठी शहरात पहिल्यांदाच ‘फुलझडी’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या शनिवार ते सोमवार अशा तीन दिवस होणार्‍या या खरेदी महोत्सवात संगमनेरकरांना अगदी रांगोळीच्या रंगापासून ते गृह सजावटीच्या सामानापर्यंत सर्व वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय येणार्‍या ग्राहकांसाठी खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्सही येथे असणार आहेत. छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांना एकाच छताखाली एकत्रित करुन शहराच्या बाजारपेठेलाही यातून ‘बुस्टर’ देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती इनरव्हीलच्या अध्यक्षा सुनीता गाढे यांनी दिली.

शनिवारी सुरु होत असलेल्या फुलझडी दिवाळी मेळ्यात विविध उत्पादनांचा समावेश असलेली जवळपास एकशे दहा दुकाने लागणार असून यात दिवाळी सणाशी संबंधीत सर्व व्यावसायिकांचा समावेश व्हावा यासाठी आयोजकांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. आजच्या काळात तरुणाईमध्ये वापरले जाणारे आधुनिक फॅशनचे महिला व पुरुषांचे तयार कपडे, असंख्य प्रकारची सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांसाठी आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, सीलबंद केलेले खाद्यपदार्थ, रोजच्या गरजेच्या वस्तू, घरात लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळीसाठी लागणार्‍या सजावटीच्या सगळ्या वस्तू, विद्युत माळा व दिवे, आर्ट व क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल्स, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू आणि आणखी बरेचकाही या महोत्सवात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या दिवाळी मेळ्यासाठी मिताली ब्रायडल वर्ल्ड व एस्पर्ट डेंटल क्लिनिक यांनी सहप्रायोजकत्व स्वीकारल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद हासे यांनी दिली.

शनिवार २८ ते सोमवार ३० ऑक्टोबर अशा सलग तीन दिवस सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मालपाणी लॉन्स, कॉलेज रोड येथे भरणार्‍या ‘फुलझडी’ दिवाळी खरेदी महोत्सवाला संगमनेरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, महेश ढोले, डॉ. एकता वाबळे, प्रतिमा गाडे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी मधुसुदन करवा, खजिनदार अमित पवार, इनरव्हील क्लबच्या सेक्रेटरी शिल्पा नावंदर, सेक्रेटरी नेहा सराफ, प्रकल्प समितीतील दीपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डॉ. किशोर पोखरकर, सीए. संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रवींद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनील घुले, मोहित मंडलिक, रमेश पावसे, विकास लावरे, संतोष आहेर, विश्वनाथ मालाणी, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, पिंकी शाह, राखी करवा, सीमा अत्रे, डॉ. श्यामा पाटील, सुनीता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी केले आहे.


संगमनेरच्या सामाजिक क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या रोटरी क्लब व इनरव्हील क्लब या दोन्ही संस्थांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला फुलझडी खरेदी महोत्सव संगमनेरकरांना सणांसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करुन देणार आहे. या माध्यमातून दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करणार्‍या संगमनेरच्या बाजारपेठेलाही ‘बुस्टर’ देण्याचे काम होणार असून नवव्यापार्‍यांना ग्राहकांशी जोडण्याचे मोठे कार्य साधले जाणार आहे. शनिवार ते सोमवार अशा तीन दिवस चालणार्‍या या खरेदी महोत्सवाला संगमनेरकरांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 8 Today: 1 Total: 29271

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *