निळवंडे उच्चस्तरीय कालव्याच्या तपासणीपूर्व कामांना गती द्या! अकोले येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत संघर्ष समितीची मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
निळवंडे धरणातून अकोले तालुक्यातील कोरडवाहू गावांना पाणी मिळावे यासाठी उच्चस्तरीय कालव्यांची कामे पूर्व करा, या मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्यावतीने सातत्याने आंदोलने सुरु आहेत. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय कालव्यांच्या कामांना गती देण्यात आली असून येत्या १५ तारखेपर्यंत जलसेतूवरील पाईप टाकण्याचे काम पूर्ण होईल. यानंतर लगेचच तपासणीचे काम सुरु केले जाणार आहे. मात्र तत्पूर्वी शिवारात गाडण्यात आलेल्या पाईप कालव्यांची तपासणी व दुरुस्ती पूर्ण करावी लागणार आहे. तपासणी व दुरुस्तीचे हे काम तत्काळ सुरु करावे व त्याच्या नियोजनात लाभक्षेत्रातील शेतकर्यांना सामावून घ्यावे या उद्देशाने अकोले विश्रामगृह येथे जलसंपदा विभागाचे अधिकारी, पाणी हक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते व लाभक्षेत्रातील गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी (ता.१०) संपन्न झाली. शिवारातील पाईपलाईनच्या तपासणी व दुरुस्तीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
उच्चस्तरीय कालव्यांचे पाईप शिवारात सहा वर्षांपूर्वी गाडण्यात आले आहेत. तपासणीच्या वेळी पाणी सोडण्यापूर्वी या बंदिस्ती कालव्यांची स्थिती तपासून घेण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता गणेश हारदे व उपविभागीय अभियंता गणेश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीनाथ गांगड यांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कामामध्ये पाणी हक्क संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी शिवारात प्रत्यक्ष गाववार मेहनत घेऊन हे काम पूर्ण केले आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटींबाबत करावयाच्या उपाययोजना निश्चित करण्यासाठी अकोले विश्रामगृह येथे ही बैठक घेण्यात आली.
उजव्या उच्चस्तरीय कालव्यांची निळवंडे ते धामणगाव आवारी शिवारातील स्थिती ठीक आहे. मात्र धामणगाव आवारी ते वाशेरे शिवारापर्यंतच्या मार्गात शेतकर्यांनी जमीन दुरुस्ती करताना पाईप कालव्याचे वॉल्व पाच ठिकाणी गाडून टाकल्याचे आढळून आले आहे. गाडण्यात आलेले वॉल्व पुन्हा उकरून काढावे लागणार आहेत. गाडलेल्या अवस्थेत ते वॉल्व खुले असतील व अशा स्थितीत तपासणीसाठी पाणी सोडण्यात आले तर येथे मोठा अपघात घडू शकतो. शेतकर्यांची शेती वाहून जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर गाडले गेलेले वाल्व सिंचन विभागाने तातडीने उकरून काढावेत व जलसेतूवरील काम पूर्ण होण्याची वाट न पाहता हे वॉल्व दुरुस्त करावेत अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
सदर गाडले गेलेले वॉल्व मोकळे झाल्यानंतर तपासाणीपूर्व काम पूर्ण होणार आहे. प्रत्यक्ष तपासणीच्या वेळी शिवारात शेतकरी व जलसंपदाच्या अधिकार्यांचा समन्वय राहावा यासाठी प्रत्येक गावातून दोन प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये डॉ. अजित नवले, मीनानाथ पांडे, किरण गजे, डॉ. रवी गोर्डे, डॉ. मनोज मोरे, आनंद नवले, विकास नवले, बाळासाहेब आवारी, बबन वाकचौरे, गणेश पापळ, नाथा भोर, रमेश आवरी, संदीप भोर व सुरेश खांडगे यांचा समावेश करण्यात आला आहे. बाळासाहेब भोर, अप्पासाहेब आवारी, शांताराम गजे, डॉ. संदीप कडलग, सुरेश भोर, माधव भोर, आर. के. जाधव, रमेश शिरकांडे आदी कार्यकर्ते तपासणीपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करत आहेत.