विजयादशमीच्या दिवशीच दानवाचा विवाहितेवर अत्याचार! खांडगाव शिवारातील घटना; नारळ-लिंबाला विवस्त्र फेरी घालण्यास सांगून साधला डाव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षणाच्या अभावाने मनात दाटलेल्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेवून कोण काय करील याचा काही भरवसा राहिला नाही. असेच काहीसे सांगणारा अतिशय धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातून समोर आला आहे. या प्रकरणात दिवसरात्र दारुच्या नशेत झिंगणार्या पतीचे व्यसन सोडवण्यासाठी अंगारे-धुपारेचा मार्ग अवलंबणार्या विवाहितेला हेरुन एका नराधमाने चक्क सायंकाळच्या सुमारास तिला नदीपात्रात नेवून तिच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर भानावर आलेल्या विवाहितेने आज पहाटे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर भोंदूगिरी करणार्या आरोपी पप्पू आव्हाड याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. ज्यावेळी मानवी रुपातील पप्पू नावाचा दानव अत्याचार करीत होता, त्याचवेळी घटनास्थळापासून काही अंतरावर हजारो माणसं एकत्र येवून कागद-पुठ्ठ्यांपासून तयार केलेल्या रावणाचे दहन करीत होते हे विशेष. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून आजच्या आधुनिक युगातही महिला अशाप्रकारांना बळी पडत असल्याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार खांडगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात ऐन विजयादशमीच्या दिवशी घडला. पतीच्या दारुच्या व्यसनाला वैतागलेल्या आणि त्याचे व्यसन सोडवण्यासाठी अंगारे व धुपारे वापरुन त्याला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार्या विवाहितेला हेरुन भोंदूगिरी करणार्या पप्पू आव्हाड याने पीडितेला तिच्या पतीची दारु सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी नदीपात्रात काही विधी करावे लागतील असे सांगत पीडितेला सायंकाळी साडेसातच्या सुमारास खांडगाव शिवारातील नदीपात्रात नेले.

यावेळी मानवी रुपातील ‘त्या’ दानवाने आपल्या मनातला कावा साधण्यासाठी सोबत आणलेल्या नारळ व लिंबाची पूजा करुन ते कोरड्या असलेल्या
पात्राच्या लगत ठेवले व पीडितेला त्या नारळ-लिंबाला विवस्त्र होवून फेरी मारण्यास सांगितले. असे केल्यास आपल्या पतीचे दारुचे व्यसन सुटेल व आपला संसार सुखी होईल या विचाराने पीडितेनेही त्या भोंदुबाबावर विश्वास ठेवून स्वतःला विवस्त्र केले व ती फेरी मारु लागली. सगळं काही मनासारखं घडतं असल्याचे पाहून एकीकडे दहन झालेला, मात्र दुसरीकडे पप्पू आव्हाड नावाच्या भोंदुबाबाच्या मनात जिवंत झालेल्या दानवाने तिला खाली पाडून आपल्या मनातील कावा साधला.

या सगळ्या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्याने पीडित महिला पात्रातच रडू लागली, मात्र तोपर्यंत अत्याचार करुन तो भोंदूबाबा तेथून पसार झाला होता. त्यानंतर आज (ता.२५) पहाटेच्या सुमारास सदरील पीडितेने शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी पप्पू आव्हाड (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्याकडे सोपविला आहे.

ज्यावेळी संबंधित पीडितेवर खांडगाव शिवारातील नदीपात्रात अत्याचार सुरु होते, त्याचवेळी त्यापासून अवघ्या काही अंतरावरच अकोले रस्त्यावरील मालपाणी उद्योग समूहाच्या कारखान्याजवळ हजारो नागरीकांच्या उपस्थितीत रावण दहनाचाही सोहळा सुरु होता. एकीकडे मानवाच्या मनातील दानवी विचारांचे दहन म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जात असताना दुसरीकडे माणसातील दानवाचे भयंकर दर्शन घडले. हा प्रकार पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या संगमनेर तालुक्यासाठी शरमेचा ठरला.

पुरोगामी महाराष्ट्रात आजही असे प्रकार घडत असल्याने आपल्या सर्वांसाठी ही बाब अतिशय शरमेची आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही घडलेला सदरचा प्रकार अत्यंत गंभीर असा आहे. याबाबत अंनिसचे सदस्य सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेतील. मात्र, महिलांनीही अशा अविवेकी मार्गाचा अवलंब करुन शोषणाला बळी पडता कामा नये.
– अॅड. रंजना गवांदे (सचिव-अंनिस बुवाबाजी संघर्ष विभाग)

