पुणे-नाशिक महामार्गावर ‘पुन्हा’ वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू! वन विभागाने उपाययोजना करण्याची तर वाहनचालकांनी काळजी घेण्याची गरज
नायक वृत्तसेवा, घारगाव
अत्यंत रहदारी असणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातात बिबट्यांचा मृत्यू होत असल्याचा सिलसिला सुरूच आहे. बुधवारी (ता.15) देखील पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडणार्या बिबट्यास भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संबंधित विभागांच्या बेजबाबदारीमुळे महामार्ग अजून किती बिबट्यांचा बळी घेणार असा सवाल वन्यजीवप्रेमी करत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, घारगाव शिवारातील एका हॉटेलजवळ बुधवारी पहाटे पाच वर्षीय वयाचा नर जातीचा बिबट्या हा अत्यंत वर्दळ असणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होता. त्याचवेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याला गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी वन विभागाला दिली. ही माहिती समजताच वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुभाष धानापुणे, दिलीप बहिरट, सुजाता टेंबरे, योगिता पवार आदिंनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला वन विभागाच्या वाहनाने शवविच्छेदनासाठी चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेले.
दरम्यान, पठारभागात जंगल क्षेत्र असल्याने वन्यजीवांचा कायमच वावर असतो. दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या देखील वाढत असून भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांकडे कूच करत आहे. त्यातच त्यांना महामार्ग ओलांडण्याचा अंदाज येत नसल्याने आळेखिंड ते कर्ह घाट या दरम्यान अनेक बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखी किती बिबट्यांना आपले जीव गमवावे लागणार आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मध्यंतरी वन विभाग आणि महामार्गाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी उपाययोजना केल्या होत्या. मात्र, अद्यापही त्या पूर्ण अंमलात आलेल्या नाहीत. यासाठी वन विभागाने लवकरात लवकर उपाय करावे आणि वाहनचालकांनी देखील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्यावी. अन्यथा दिवसेंदिवस वन्यजीवांची संख्या अधिकच कमी होवून पर्यावरणावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल.