दिलासा! संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर जिल्ह्यात सर्वाधिक!
दिलासा! संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर जिल्ह्यात सर्वाधिक!
मात्र संक्रमणाची गती कायम असल्याने महिना अखेरपर्यंत तालुका पोहोचणार साडेचार हजारांच्या पार?
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र उभे राहिले आहे. संगमनेरातही ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्याचा परिणाम स्पष्टपणे बघायला मिळाला. मात्र गेल्या पंधरा दिवसात चढ-उतार करीत समोर येणार्या आकडेवारीने संगमनेरकरांच्या चिंतेत भर घातली असून रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहील्यास या महिन्याच्या अखेरपर्यंत तालुका साडेचार हजार रुग्णसंख्येजवळ पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येत चढ-उतार अनुभवण्यास येत असले तरीही रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण तब्बल 92 टक्क्यांवर पोहोचल्याने संगमनेरकरांना चिंतेतही समाधानाची ऊब मिळाली आहे.

गेल्या 1 ऑक्टोबरपासून आजपर्यंतच्या पंधरवड्याचा विचार करता या कालावधीत गुरुवारपर्यंत (ता.15) शहरी रुग्णसंख्येत 9.13 रुग्ण दररोज या सरासरीने 137 रुग्णांची तर ग्रामीण क्षेत्रातून 33.2 रुग्ण दररोज या गतीने तब्बल 498 रुग्णांची नव्याने भर पडली. या कालावधीत तालुक्यातील संक्रमणाची व्याप्तीही वाढली, त्यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत 130 गावांपर्यंत कोविडचे संक्रमण आजच्या स्थितीत तालुक्याचा जवळपास 88 टक्के भाग व्यापताना शहरासह 150 गावांपर्यंत पोहोचले आहे. शहर आणि ग्रामीणक्षेत्र मिळून एकूण वाढलेल्या रुग्णांच्या दररोजची सरासरी 42.33 रुग्ण प्रती दिवस अशी आहे.

2 एप्रिल रोजी आश्वी ब्रु. येथील एकासह नायकवाडपुरा येथून तिघे असे एकूण चार रुग्ण पहिल्यांदा समोर आले. चाराचे नऊ होण्यासाठी सुरुवातीला 36 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर अवघ्या एकाच दिवसांत 8 मे रोजी 9 वरुन तालुक्याची रुग्णसंख्या 18 वर गेली. नंतर दुहेरी होण्याचा वेग 22 दिवसांवर कायम राहिला व 30 मे रोजी रुग्णसंख्या 35 वर पोहोचली. तेरा दिवसांनंतर 12 जून रोजी तालुक्याची रुग्णसंख्या 35 वरुन 70 वर पोहोचली. यानंतर रुग्णसंख्या डबल होण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी गेला व 5 जुलैरोजी एकूण रुग्णसंख्या 140 वर पोहोचली.

रुग्णवाढीचा दर यापुढे काहीसा वाढल्याने रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही खाली येत अवघ्या 10 दिवसांतच 15 जुलै रोजी तालुका 140 वरुन थेट 279 वर पोहोचला. याच गतीने पुढील अकरा दिवसांतच 26 जुलैपर्यंत तालुक्याची रुग्णसंख्या 279 वरुन 558 वर तर 13 ऑगस्टपर्यंतच्या 18 दिवसांत 1 हजार 115 पर्यंत बाधितांचा आकडा पोहोचला. ऑगस्टपासून तालुक्यातील संक्रमितांची गती काहीशी वाढल्याचे निरीक्षणही या आकडेवारीतून समोर आले.

14 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या 28 दिवसांच्या कालावधीत सरासरी चाळीस रुग्ण दररोज या गतीने तालुक्याच्या रुग्णसंख्येने थेट 2 हजार 230 रुग्णसंख्येपर्यंत मजल मारली. 11 सप्टेंबरपासून आज अखेरपर्यंतच्या 35 दिवसांचा विचार करता तालुक्याच्या रुग्णसंख्येत सरासरी 47 रुग्णांची दररोज वाढ होत असून या कालावधीत 1 हजार 648 रुग्णांची नव्याने भर पडून तालुका 3 हजार 886 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे. रुग्णवाढीची हीच गती यापुढेही कायम राहिल्यास पुढील बारा ते पंधरा दिवसांतच संगमनेर तालुक्यातील बाधितांची संख्या साडेचार हजारांच्या पार जाण्याचा अंदाजही रुग्णदुप्पट होण्याच्या आकडेवारीवरुन लावता येवू शकतो.

13 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग प्रती दिवस 39.38 रुग्ण असा होता. या 29 दिवसांच्या कालावधीत संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 142 रुग्णांची भर पडली. तर 11 सप्टेंबरपासून कालच्या 15 ऑक्टोंबरपर्यंतच्या 35 दिवसांत सरासरी दररोज 47.08 या वेगाने रुग्णसमोर आल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 648 नवीन बाधितांची भर पडली आहे. तालुक्यातील संक्रमणाचा वेग असाच राहीला तर येत्या महिना अखेरीस तालुका साडेचार हजारांच्या पुढे जाईल हे नक्की.
चालू महिन्यात रुग्णगतीतला चढ-उतार अनुभवायला मिळाला असला तरीही अगदी सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 42 टक्क्यांवर असताना आजच्या स्थितीत त्यात आमुलाग्र बदल होवून आज तब्बल 92 टक्के रुग्ण बरे होत असल्याने संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत दिलासादायक वार्ता आहे. त्यासोबतच गेल्या महिन्यात तब्बल 20 जणांचे बळी घेणार्या कोविडने या महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसांत 10 ऑक्टोबररोजी चिकणी येथील 60 वर्षीय महिला व 13 ऑक्टोबर रोजी विठ्ठलनगर (गुंजाळवाडी) परिसरातील 70 वर्षीय इसम अशा दोघांचा बळी घेतला. चालू महिन्यात कोविडचे संक्रमण होवून मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने आजच्या स्थिती संगमनेर तालुक्याचा मृत्यू दर अवघा 1.02 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येतही रुग्ण बरे होण्याचे आणि संक्रमणात मृत्यू होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याने संगमनेरकर काहीसा सुखावला आहे.
येणार्या कालावधीत गारठा वाढणार असल्याने कोविडच्या संक्रमणाची गती वाढण्याचीही शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी मुखपट्टी (मास्क) शिवाय बाहेर फिरणे धोकादायक ठरण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यासोबतच नागरिकांनी सामाजिक अंतर व वारंवार हात धुण्याची सवय कायम ठेवल्यास वाढत्या रुग्णसंख्येवरही नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याने नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



