खताळ यांच्या ठिय्यानंतर नायब तहसीलदारांची बदली!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील नायब तहसीलदार सुधीर सातपुते यांची बदली होवूनही त्यांना कार्यमुक्त केले जात नसल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी तहसीलदार अमोल निकम यांच्या दालनात सोमवारी (ता.1) ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत तक्रार अर्ज निकाली निघत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा घेतल्याने अखेर तहसीलदारांनी कार्यमुक्त आदेश काढला. त्यानंतर खताळ यांनी आंदोलन स्थगित केले.

नायब तहसीलदार सुधीर सातपुते यांची शासन आदेशनुसार 20 ऑक्टोबर, 2020 रोजी विनंतीने नाशिक तहसील कार्यालय येथे बदली झालेली होती. विनंती बदली मागितल्यामुळे कार्यमुक्त होणे गरजेचे असताना ते आपला कार्यभार सोडत नव्हते. यावरुन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यातच महसूल अधिकार्‍यांकडून शासन आदेशाची पायमल्ली होत होती. तसेच त्यांचा येथील कार्यकाल हा वादग्रस्त राहिलेला होता. कोविडमध्ये भाजीपाला विक्री करणार्‍या शेतकरी बांधवांना मारहाण करणे, ग्रामीण भागातील दूध वाहतूक करणार्‍या वाहनाच्या हवा सोडणे, कार्यालयीन वेळेत उपस्थित नसणे, संजय गांधी योजनेमध्ये नागरिकांशी उद्धट वागणूक, मनमानी कारभारासह कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनीही त्यांच्या विरोधी तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही होत नव्हती. यामुळे नागरिकांमध्ये सातपुते यांच्याविषयी मोठा रोष होता. वेळोवेळी नागरिकांनी सातपुते यांच्या वागणुकीविषयी तक्रारी केल्या होत्या. परंतु काही वरीष्ठ अधिकारी त्यांना पाठिशी घालत असल्यामुळे कारवाई होत नव्हती. या बदलीबाबत 2 डिसेंबर, 2020 तहसीलदारांकडे तक्रार करून नायब तहसीलदार यांच्याकडील कार्यकाल काढून घेण्याबाबत विनंती केली होती. त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी सोमवारी तहसीलदार अमोल निकम यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू करून जोपर्यंत माझा तक्रार अर्ज निकाली निघत नाही तोपर्यंत मी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा घेतला. याची तहसीलदार निकम यांनी गंभीरतेने दखल घेत नायब तहसीलदार सातपुते यांना आदेश क्रं.आस्था/31/2021 दि.01/02/2021 नुसार कार्यमुक्त करत असल्याचे पत्र दिल्यामुळे हे आंदोलन खताळ यांनी स्थगित केले.

Visits: 176 Today: 5 Total: 1800336

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *