संगमनेरच्या डॉ.संजय मालपाणी यांचा राष्ट्रीय बहुमान! साडेतिन दशकांचा अनुभव आता योगासनांना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचवणार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या साडेतिन दशकांहून अधिक काळापासून गीता परिवाराच्या माध्यमातून बालसंस्कार क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेरच्या डॉ.संजय मालपाणी यांचा राष्ट्रीय बहुमान करण्यात आला आहे. योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त करुन देत, त्याचा जगभरात प्रचार-प्रसार व्हावा, या खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून त्याचा समावेश ऑलिम्पिकमध्ये व्हावा या हेतूने स्थापन झालेल्या राष्ट्रीय योगासन खेल महासंघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. महासंघाचे संस्थापक योगमहर्षी स्वामी रामदेव यांनी या निवडी जाहीर करतांना डॉ.मालपाणी यांच्यावर उपाध्यक्षपदासह राष्ट्रीय स्पर्धांचे संयोजन व अभ्यासक्रम निर्धारण समितीचीही जबाबदारी सोपविली आहे.


योगासनांचा खेळ म्हणून समावेश व्हावा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धा व्हाव्यात व त्यांना क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळावी, आशियायी व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये योगासन खेळाला स्थान मिळावे या उद्येशाने योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय योगासन खेल महासंघाची स्थापना करण्यात आली. या संघाच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीही करण्यात आल्या. त्यात मोरारजी देसाई योगसंस्थानचे संचालक डॉ.ईश्‍वर बसवरेड्डी यांची अध्यक्षपदी, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांची उपाध्यक्षपदी, तर पतंजली योग समितीचे डॉ.जयदीप आर्य यांची महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय महासंघाच्या स्पर्धा संयोजन व अभ्यासक्रम निर्धारण समितीचे महत्त्वपूर्ण कामही डॉ.संजय मालपाणी यांच्यावर सोपविण्यात आले आहे.


जागतिक योगासन क्रीडा महासंघाचे अध्यक्ष योगमहर्षी स्वामी रामदेव महाराज व महासचिव – एस् व्यासा योग विद्यापीठ, बेंगलोरचे कुलपती डॉ.नागेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली जगातील विविध देशात योगासन क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था व व्यक्तिंचे संघटन उभे केले जात आहे. पारंपारिक योगासनांना आधुनिक कलात्मक आणि तालबद्ध योगासनांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ही संघटना पुढाकार घेणार आहे.


गीता परिवाराच्या माध्यमातून हजारों शालेय विद्यार्थ्यांपर्यंत क्रमिक योग सोपानचे प्रशिक्षण व परीक्षण, भव्य योग महोत्सवाचे आयोजन, सूर्यनमस्कार स्पर्धा, ध्रुव ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांच्या आयोजनाचा अनुभव, बृहन् महाराष्ट्र योग परिषदेचे अध्यक्षपद, शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या श्री.माधवलाल मालपाणी योग व निसर्गोपचार केंद्राचे कार्याध्यक्ष अशा विविध माध्यमातून केलेल्या योग क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे महासंघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या प्रेरणेतून साडेतिन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या गीता परिवाराच्या माध्यमातून डॉ.संजय मालपाणी यांनी बालसंस्कार क्षेत्रात देशभरातील 18 पेक्षा अधिक राज्यात मोठे काम उभे केले आहे. आजवर लाखों बालकांना संस्कारक्षम करण्यासोबतच योगासन आणि सूर्यनमस्काराच्या प्रचार आणि प्रसारातही त्यांचे मोठे योगदान आहे. चार वर्षांपूर्वी संगमनेरात झालेल्या राष्ट्रीय योग महोत्सवातून या क्षेत्रातील त्यांच्या व्यापक कार्याची झलक खुद्द योगमहर्षी स्वामी रामदेव यांनी अनुभवली आहे. आता याच क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या हातून निश्‍चितच मोठे काम घडेल असा विश्‍वास संगमनेरातून व्यक्त केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *