साईबाबांच्या झटपट दर्शनासाठी उकळले साडेतीन हजार रुपये! पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे सांगताच दुकानदाराने पैसे केले परत


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीमध्ये साईभक्तांच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दर्शन पासच्या काळाबाजाराचा विषय चव्हाट्यावर आलेला असतानाच दलालांकडून झटपट दर्शनाचे आमिष दाखवून साईभक्त महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची आणखी एक घटना समोर आली. यात महिलेकडून साडेतीन हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र शिर्डीत प्रवेश करताच अनेक एजंट भाविकांना झटपट दर्शनाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असतात. अशाच पद्धतीने त्रिपुरा राज्यातील पूनम भौमिक या परिवारातील वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसह शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शिर्डीत प्रवेश करताच दुचाकीवरून आलेल्या काही एजंटने त्यांना लवकर दर्शन करून देण्याचे सांगितले. त्यानंतर हे एजंट त्यांना मंदिर परिसरातील एका खासगी हार-फूल प्रसादाच्या दुकानात घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांना चक्क साडेतीन हजार रुपयांचे प्रसादाचे ताट बनवून दिले आणि ताट मंदिरात घेऊन गेल्यानंतर तुम्हांला झटपट दर्शन मिळेल असे आमिष दाखवले.

मात्र सदर महिला दर्शन रांगेत गेल्यानंतर साई मंदिरात फूल, हार, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी असल्याचे तिला सुरक्षारक्षकांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने संबंधित दुकान गाठले. यावेळी दुकानदार आणि साईभक्त महिला यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे सांगताच दुकानदाराने तिला पैसे परत केले. इतरांची फसवणूक होऊ नये यासाठी पूनम भौमिक यांनी आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.
कोविड काळापासून साईमंदिरात हार, फूल व प्रसादाला बंदी आहे. अशावेळी भक्तांची फसवणूक होत असेल तर ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिर्डी ग्रामस्थांनी दिली. साईबाबा संस्थानने सुद्धा हार, फूल, प्रसाद स्वीकारत नसल्याचे मोठे फलक लावले तर फसवणूक होणार नाही. शहरात सध्या एजंट मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत असून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *