किरकोळ कारणातून दुचाकी पेटविली! म्हाळुंगी नदी पुलावरील थरार; तिघांवर गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोघांचे भांडण सुरु असताना उत्सुकतेपोटी ते पाहण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वारासह त्याच्या जोडीदाराला मारहाण करीत त्याची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी शहरात घडली. या प्रकरणी मालदाड रोडवरील गोकुळ गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी घनश्याम बर्डे, सद्दाम व राहुल सोनवणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरची घटना असामाजिक तत्त्वांचा नेहमीच मोठा वावर असलेल्या अकोले नाका परिसरातील खोकलाई देवीच्या मंदिराजवळ घडली. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
![]()
याबाबत गोकुळ गडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता.21) रात्री साडेदहाच्या सुमारास अकोले नाक्यावरील खोकलाई देवीच्या मंदिराजवळ काही जणांमध्ये होणामार्या सुरु होत्या. यावेळी आसपासचे काही नागरिक तेथे गोळा झाले होते. त्याच सुमारास दुचाकीवरुन आपल्या जोडीदारासह घराकडे निघालेले गोकुळ गडगे काय चालले आहे हे पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी तेथे थांबले. त्याचा राग आल्याने भांडण करणार्या तिघांनी त्यांनाच लक्ष्य केले आणि त्यांच्यासह त्यांच्या साथीदाराला विनाकारण लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या गदारोळात त्याची दुचाकी (एम.एच.17/सी.डी.7542) खाली पडल्याने वाहनाच्या टाकीतून मोठ्या प्रमाणात पेट्रोल सांडले.

यावेळी सद्दाम व सोनवणे हे दोघे दोघा जणांना मारहाण करीत असताना आरोपी घनश्याम बर्डे याने काड्यापेटीच्या सहाय्याने जमीनीवर पडलेल्या दुचाकीला आग लावली. सदरच्या वाहनातील पेट्रोल बाहेर सांडलेले असल्याने आग लागताच क्षणात संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि काही वेळातच संपूर्ण भस्म झाली. त्यानंतरही त्या तिघांनी दोन्ही दुचाकीस्वारांवर दादागिरी करीत त्यांना धक्काबुक्की करीत तेथून हुसकावून दिले व ते तेथून पसार झाले. या घटनेबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी परिसरात काही ठिकाणी छापे मारण्यात आले, मात्र त्यापूर्वीच तिघेही गायब झाले होते. या प्रकरणी दाखल फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील तिनही आरोपींच्या विरोधात भा.दं.वि. कलम 435, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून समाजात दहशत निर्माण करणार्यांना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

अकोले नाका परिसरातील म्हाळुंगी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे बोकाळली असून या परिसरात अनेक असामाजिक व गुन्हेगारी तत्त्वांचे वास्तव्य वाढले आहे. संगमनेर घडणार्या अनेक गुन्ह्यांमध्ये या परिसरातील आरोपींचा सहभाग असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. असे असतानाही नदीपात्रातच वस्ती करुन गुन्हेगारी करुनही या भागातील अतिक्रमणांना आजवर हात लावला गेला नाही. या भागाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष भविष्यात शहरासाठी मोठे संकट निर्माण करणारे ठरु शकते. प्रशासनाने या गोष्टीचा गांभिर्याने विचार करुन किमान या भागात वास्तव्य करणार्यांची ओळख पटविण्याची गरज आहे.

