घरपट्टीमध्ये केलेली दहा टक्के करवाढ तत्काळ रद्द करावी! संगमनेर काँग्रेसची मागणी; अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के वाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची करवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. ही दरवाढ त्वरीत रद्द न झाल्यास या दरवाढीच्या विरोधात संगमनेर शहर काँग्रेस समिती मोठे आंदोलन उभारेल असा इशारा माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांनी दिला आहे.

संगमनेर नगरपरिषदेला याबाबतचे निवेदन शहर काँग्रेस समितीच्यावतीने देण्यात आले आहे. हे निवेदन कार्यालय निरीक्षक राजू गुंजाळ, कर निरीक्षक सादिक पटेल यांनी स्वीकारले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखील पापडेजा, माजी नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख, राजेंद्र वाकचौरे, सुनंदा दिघे, हैदर अली सय्यद, मिलिंद औटी, बाळासाहेब पवार आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर निवेदनात म्हटले की, संगमनेर नगरपरिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिव्हिजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहे. यात शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के वाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची करवाढ अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. तरी घरपट्टीत केलेली ही वाढ त्वरीत रद्द करावी. अन्यथा शहरवासियांना घेऊन मोठे आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाची राहील असा इशाराही काँग्रेस समितीच्यावतीने देण्यात आला आहे.


अत्यंत प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण झालेले संगमनेर शहर आहे. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वत्र महागाई, बेरोजगारी वाढली असून व्यापार मंदीही झाली आहे. या काळात सरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी करवाढ करणे अत्यंत चुकीचे आहे. ही जुलमी करवाढ रद्द न केल्यास शहरात काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
– दिलीप पुंड (माजी नगराध्यक्ष-संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *