संगमनेर शहर हद्दित चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच शहरात पोलीस आहेत का?; आता चक्क शासकीय गोदामासह हॉटेल फोडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही महिन्यांपासून बिघडत चाललेल्या शहराच्या सामाजिक स्वास्थात आता गुन्हेगारी कारवायांसह चोरट्यांनीही धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून शहरात पोलिसांचे अस्तित्व आहे की नाही अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी तर चक्क पोलीस निरीक्षकांच्या नाकावर टिच्चून न्यायाधीशांचाच बंगला फोडल्यानंतर आता चोरट्यांनी गुंजाळवाडी शिवारातील शासकीय धान्य गोदामासह शेतकरी नावाचे हॉटेल फोडून तब्बल 90 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेल्या हॉटेलमधून फ्रिज, भांडे आणि किराणा सामानासह चक्क बल्बही लांबवण्यात आल्याने शहरात पोलिसांचा धाक जवळपास संपुष्टात आल्याचेच दिसत आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरीचा पहिला प्रकार गेल्या गुरुवारी (ता.12) पहाटेच्या सुमारास पुणे-नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील शेतकरी हॉटेलमध्ये घडला. गुंजाळवाडी शिवारात असलेल्या या हॉटेलला लक्ष करीत चोरट्यांनी आंत प्रवेश केला. या घटनेत चोरट्यांनी चक्क हॉटेलमधील 35 हजार 500 रुपये किंमतीचा चारशे लिटर क्षमतेचा रेफ्रिजरेटर (फ्रिज), 39 हजार 279 रुपयांचे हॉटेलमधील वापराचे भांडे, 8 हजार 563 रुपयांचे किराणा सामान आणि 4 हजार 810 रुपये एकत्रित किंमतीचा मिक्सर ग्राईंडर व दोन एलईडी दिवे असा एकूण 85 हजार 152 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

या हॉटेलमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी वापराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडे व किराणा लांबविण्याने त्यासाठी त्यांच्याकडून चारचाकी वाहनाचा वापर केला गेला असण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी हॉटेलचे मालक सुनील राधाकिसन शिंदे (रा.वकील कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर, दुसरी घटना मंगळवारी (ता.17) पहाटेच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारातूनच समोर आली असून या घटनेने निष्क्रिय पोलिसांमुळे चोरट्यांचे मनोबल किती उंचावर गेले आहे याचेच प्रत्यंतर मिळत आहे.

शहरातील गोरगरीबांसाठी स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शासकीय पुरवठा विभाग अन्नधान्याचा पुरवठा करीत असतो. शासनाकडून मिळणारे धान्य साठवण्यासाठी संगमनेरच्या पुरवठा विभागाने गुंजाळवाडी शिवारात गोदामही उभारले आहे. याच गोदामाला चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास लक्ष केले आणि दरवाजाची कुलुपं तोडीत आंत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांना अन्य मुद्देमान न मिळाल्याने त्यांनी गोदामात ठेवलेल्या सुमारे सहा हजार रुपये मूल्याचा दोन मोठ्या तात्रपत्री घेवून तेथून पळ काढला. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुरवठा विभागातील अधिकारी सुनील दुर्गुळे यांनी फिर्याछ दाखल केली आहे. या दोन्ही घटनांत मिळून एकूण 91 हजार 152 रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे.

मोठ्या कालावधीपासून अपवाद वगळता थांबलेल्या चोरीच्या घटनांमध्ये मागील काही कालावधीपासून अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच शहर पोलिसांच्या निष्क्रियतेची परंपरा अद्यापही कायम असल्याने तपास नावाचा भाग पोलिसांच्या कामातून जवळपास हद्दपारच झाला की काय अशीही स्थिती आहे. त्याचा परिपूर्ण लाभ घेत गुन्हेगारांसह सर्वप्रकारचे अवैध व्यावसायिक व आता चोरटेही पुढे सरसावले असून शहरात एकामागून एक घटना घडतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत असून त्यांना दिलासा देण्यासाठी चोरीच्या घटनांना पायबंद बसण्यासह घडलेल्या प्रकारणांचा तपास पूर्ण होण्याची आवश्यकता आहे, मात्र त्याची शक्यताही धुसरच असल्याने सध्या शहरात चोरट्यांचा मनसोक्त धुमाकूळ सुरुच आहे.

गेल्या काही घटनांकडे पाहता बहुतेक चोरीचे प्रकार रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुकानांमध्ये व उपनगरांमधील घरांमध्येच अधिक प्रमाणात घडत आहेत. त्यावरुन मनसोक्त चोरी करण्यासाठी चोरट्यांनी शहराभोवतीची उपनगरे लक्ष केल्याचे दिसत आहे. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत असतांना पोलिसांकडूनही त्यात वाढ केल्याचे सांगितले जात असतांनाही चोरीच्या घटना थांबत नसल्याने शहर पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तींवरील धाक संपुष्टरात आल्याचे चित्र सध्या संगमनेरसारख्या जिल्ह्यातील आघाडीच्या शहरात बघायला मिळत आहे.

