शासनाच्या अधिसूचना धुडकाविणार्‍या संगमनेरातील धर्मदाय रुग्णालयांची चौकशी सुरू! धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाने कारवाई; गणेश बोर्‍हाडे यांनी दिला होता आत्मदहनाचा इशारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जगभरात सलग दोन वर्ष प्रचंड धुमाकूळ घालणार्‍या कोविड संक्रमणाच्या कालावधीत बाधित रुग्णांची होणारी प्रचंड आर्थिक लूट थांबविण्यासाठी राज्य सरकारने खासगी व धर्मदाय रुग्णालयांसाठी अधिसूचना काढली होती. त्यानुसार राज्यातील धर्मदाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या दुर्बल व निर्धन रुग्णांकडून कोणतेही उपचार शुल्क आकारले जावू नयेत असेही बजावण्यात आले होते. त्या अधिसूचनेतील या मुद्द्यासह अन्य काही मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी एकाकी लढा देत त्यासाठी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. त्यानंतर संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी शिष्टाई करीत याप्रकरणी कारवाईचे आदेश दिल्यानंतर कोविड उपचार करणार्‍या संगमनेरातील पाच धर्मदाय रुग्णालयांतील चार रुग्णालयांनी ‘त्या’ आदेशाची अर्धवट पूर्तता केली तर डॉ. वामनराव इथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने मात्र त्याला केराची टोपली दाखवल्याने अखेर राज्याच्या धर्मदाय आयुक्तांच्या आदेशानुसार अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्तांनी इथापेसह या पाचही रुग्णालयाची चौकशी सुरु केली आहे. याबाबत संगमनेरच्या तहसिलदारांनी सदर रुग्णालयांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा अहवाल यापूर्वीच सोपविला असल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.


कोविड संक्रमणाच्या कालावधीत राज्यातील अनेक रुग्णालयांकडून रुग्णांची मोठी आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने त्याची गांभिर्याने दखल घेताना 3 जून, 2021 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करुन कोविड बाधितांच्या उपचाराच्या देयकाचे लेखा परीक्षण करण्यासह धर्मदाय म्हणून मान्यता प्राप्त केलेल्या रुग्णालयांसाठी निर्देशही जारी केले होते. अशा रुग्णालयांच्या नावातच ‘धर्मदाय’ असा उल्लेख असण्यासह तेथे उपचार घेणार्‍या दुर्बल व निर्धन घटकांकडून उपचारांप्रित्यर्थ घेतलेली देयके त्यांना परत करण्याचे आदेशही देण्यात आले होते. संगमनेर तालुक्यात एकूण आठ धर्मदाय रुग्णालये असून त्यातील पाच रुग्णालयांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू झाले होते. त्यातील काहींमध्ये अशा घटकांसाठी 10 टक्के खाटा तर काहींमध्ये नमूद केलेल्या सर्व खाटा राखीव ठेवण्याची गरज होती.


मात्र शासनाची अधिसूचना जारी होवूनही संगमनेरातील कोणत्याही धर्मदाय रुग्णालयाने ना आपल्या रुग्णालयाच्या नावात धर्मदाय असा उल्लेख केला, ना दुर्बल व निर्धन कोविड बाधितांवर मोफत उपचार केले. त्यामुळे अधिकसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश बोर्‍हाडे यांनी 4 ऑगस्ट, 2021 रोजी संगमनेरच्या तहसीलदारांकडे कारवाईची मागणी करीत तक्रार अर्ज दाखल केला. त्यावर कालबद्ध मर्यादेत कारवाई न झाल्यास स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्याची दखल घेत संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांनी शिष्टाई करीत 9 ऑगस्ट रोजी प्रशासकीय भवनात बैठक बोलावली होती.

या बैठकीत त्यांनी संगमनेर तालुक्यातील धर्मदाय रुग्णालयात दाखल असलेल्या दुर्बल व निर्धन रुग्णांच्या नावांची यादी, दाखल दिनांक, उपचारांती त्यांना सोडल्याची तारीख व घेण्यात आलेली देयकाची रक्कम धर्मदाय रुग्णालयाकडून मागविण्याबाबत निर्देश दिले होते. त्या प्रमाणे संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम यांनी या पाचही रुग्णालयांशी पत्रव्यवहार करुन त्यांना 15 दिवसांत अशा स्वरुपाची यादी सादर करण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार तालुक्यातील संजीवन हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (घुलेवाडी), अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल (मांची हिल), सिद्धकला हॉस्पिटल (संगमनेर खुर्द) व वृंदावन हॉस्पिटल (चंदनापुरी घाट) या कोविड रुग्णांवर उपचार करणार्‍या धर्मदाय रुग्णालयांनी केवळ रुग्णांच्या नावाच्या याद्या दिल्या, मात्र त्यांची दुर्बल व निर्धन अशी वर्गवारी करण्याचे टाळले, तर डॉ. वामनराव इथापे धर्मदाय रुग्णालयाने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित कोणतीही माहिती दिली नाही.

त्यामुळे गेल्या वर्षी 22 डिसेंबर रोजी संगमनेरच्या तहसीलदारांनी राज्याच्या धर्मदाय आयुक्तांना याबाबतची माहिती देत त्यांच्या स्तरावरुन या पाचही धर्मदाय रुग्णालयात दाखल दुर्बल व निर्धन रुग्णांची माहिती व त्यांच्या देयकांबाबत सखोल चौकशी करुन लेखापरीक्षण करण्याची विनंती केली होती. याच विनंतीपत्रात डॉ. वामनराव इथापे धर्मदाय रुग्णालयाने शासनाच्या विविध अधिसूचनांवर कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या या पत्राची दखल घेत राज्याच्या धर्मदाय आयुक्तांनी 10 फेब्रुवारी, 2022 रोजी अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्तांना आदेशित करताना संगमनेरच्या तहसीलदारांनी पाठविलेल्या अहवालानुसार उपरोक्त पाचही रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या दुर्बल व निर्धन कोविड रुग्णांची यादी, त्यांना दाखल केल्याची व सोडल्याची तारीख व त्यांच्याकडून घेण्यात आलेल्या देयकांबाबत 15 दिवसांत सखोल चौकशी करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याच आदेशात डॉ. वामनराव इथापे रुग्णालयाने शासनाच्या अधिसूचनांचे उल्लंघन केल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

त्यांच्या आदेशानुसार अहमदनगरच्या धर्मदाय उपायुक्तांकडून फेबु्रवारीतच कारवाई होणे अपेक्षित होते, मात्र काही कारणास्तव सदरची चौकशी लांबली. ती आता सुरु करण्यात आली असून संगमनेरातील संजीवन हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर (घुलेवाडी), अश्विन रुरल आयुर्वेद हॉस्पिटल (मांची हिल), सिद्धकला हॉस्पिटल (संगमनेर खुर्द) व वृंदावन हॉस्पिटल (चंदनापुरी घाट) या चार धर्मदाय रुग्णालयांनी सादर केलेल्या याद्यांनुसार दुर्बल व निर्धन घटकांच्या देयकांचे पुनर्रलेखापरीक्षण केले जाणार आहे. या चौकशीत अद्यापपर्यंत अशा प्रकारची कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या डॉ.वामनराव इथापे धर्मदाय रुग्णालयावर कशा प्रकारची कारवाई होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोविड संक्रमणाच्या दोन वर्षांच्या कालावधीत संगमनेरातील अनेक खासगी व धर्मदाय रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः आर्थिक लूट करीत कोट्यावधी रुपये कमावले. या कालावधीत संगमनेरातील बाधितांसह अन्य तालुक्यातील व जिल्ह्यातील असंख्य रुग्णांनीही येथे येवून उपचार घेतले. आता या सर्व घटनाक्रमाला मोठा कालावधी लोटला असल्याने धर्मदाय उपायुक्तांच्या चौकशीत नेमके काय समोर येते हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र डॉ. वामनराव इथापे हॉमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने राज्य सरकारच्या सर्व अधिसूचनांसह स्थानिक प्रशासनाचे आदेशही धूडकावल्याने त्यांच्यावर कारवाई होणार हे मात्र निश्चित आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 118770

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *