राजकीय रंगात न्हाऊन निघालेले ‘दिवे’ उजळले! संगमनेरच्या महामार्गावर लखलखाट; दोन्हींकडून रंगली पुन्हा जुगलबंदी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या जुन्या पुणे-नाशिक महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणासह सुशोभीकरण पूर्ण झाले. ६५ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २५ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यावरुनच काँग्रेस आणि भाजपात कलगीतुरा रंगला असून श्रेयवादाच्या लढाईत एकाच दिवशी दोनवेळा या महामार्गाच्या लोकार्पणासह विद्युतीकरण झालेल्या दिव्यांना उजाळण्याचा सोहळाही पार पडला होता. मात्र इतके मोठे राजकीय नाट्य पार पडल्यानंतरही गेल्या पंधरा दिवसांपासून हा महामार्ग अंधारातच डूंबलेला होता. आता बुधवारी (ता.११) कोणत्याही राजकीय उत्सवाशिवाय या महामार्गावरील सर्व पथदिवे उजळल्याने संगमनेरकरांना बदललेल्या शहराचे विहंगम दृष्य बघायला मिळाले, मात्र या एकंदरीत विषयातून उठणारे राजकीय चर्चांचे धुमारे आजही उडतच आहेत.

संगमनेर शहरातून जाणार्‍या पुणे-नाशिक महामार्गावरील वाढती रहदारी लक्षात घेवून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून शहराला पर्यायी बायपास रस्ता निर्माण करण्यात आला. खेड ते सिन्नरपर्यंतच्या अंतरावरील या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाल्यानंतर अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय ते रायतेवाडी फाटा या अंतरावरील शहरातून जाणारा जुना महामार्ग दुर्लक्षित होवू लागला होता. त्यातच शहरी भागातील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे हा महामार्ग संकुचित झाल्याने वाहतूक कोंडी, अपघात यासारख्या गोष्टी घडत राहिल्याने रस्त्याचे विस्तारीकरण आवश्यक झाले होते. त्यामुळे आमदार थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाठपुरावा करीत जुन्या महामार्गाच्या विस्तारीकरण व सुशोभीकरणासह विद्युतीकरणाचा प्रस्ताव सादर करीत त्याचा पाठपुरावा केला.

राज्याचे महत्वाचे महसूल खाते सांभाळताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचा थेट संवाद होवू लागल्याने एका बैठकीत थोरात यांनी संगमनेरातील महामार्गासाठी निधी देण्याची विनंती केली. मंत्री असलेल्या थोरात यांनी राज्यातील केंद्रीय रस्त्यांसाठी केलेले सहकार्य आणि सतत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचा परिपाक गडकरी यांनीही विनाविलंब त्यांना केंद्रीय रस्ते विकास निधीतून २५ कोटी रुपयांचा निधी दिला. वास्तविक या मार्गाच्या कामासाठी एकूण ६५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, त्यातील ४० टक्के निधी केंद्राकडून तर उर्वरीत ६० टक्के निधी राज्याकडून प्राप्त झाला आणि या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या गणेशोत्सवात पूर्ण झाले.

विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर गणेशोत्सवातच रस्त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी आमदार थोरात यांनी २६ सप्टेंबर रोजी ‘हॅप्पी हायवे’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला होता. भरपावसात झालेल्या या कार्यक्रमात संगमनेरकरांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून. एरव्ही प्रचंड रहदारीने गजबजलेल्या या रस्त्यावर मुले, मुली, महिला व नागरिक वेगवेगळे खेळ खेळत होते, झुंबा नृत्य करीत होते, कोणी गाणे गात होते, तर कोणी वाद्य वाजवत होते. लहान मुले कब्बडी, खो खो, क्रिकेट, बॅडमिंटन खेळतानाचेही चित्र यावेळी दिसून आले. सायंकाळी महामार्गावरील सर्व दिवे उजळल्यानंतर या सर्वांनी जल्लोषही केला. नाशिक रोडवरील अशाच एका उजळलेल्या दिव्याखाली उभारलेल्या मंचावरुन जनसंवाद साधताना आमदार थोरात यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उल्लेख करुन त्यांचे सहकार्य लाभल्याची कृतज्ञता व्यक्त केली, मात्र केवळ तेवढ्याच पैशांत हा महामार्ग झाल्याच्या चर्चेचा फुगाही त्यांनी फोडला.

तत्पूर्वी सकाळी ११ वाजताच स्थानिक भाजपाने पोस्टरबाजी करीत गणेशनगरजवळ मोठा मंच उभा करुन लोकर्पण सोहळा आयोजिला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला तसे पत्र देवूनही त्यावेळी विद्युत पुरवठा होवू शकला नाही. त्यातच दुपारच्या सुमारास जोरदार पावसालाही सुरुवात झाल्याने भाजपाचा कार्यक्रम उधळला जाईल असे वाटत असताना वीज पुरवठ्यासाठी भाजप पदाधिकार्‍यांनी बसस्थानकाजवळ भररस्त्यात ठिय्या दिला. पावसामुळे सदरचे आंदोलन फार काळ टिकेल अशी अपेक्षा नसतानाही कार्यकर्ते तब्बल तीन तास ठाण मांडून बसून राहिले. अखेर सायंकाळी चारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला सदरील पथदिवे सुरु करण्यात यश आले आणि त्यातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आग्रह तडीस गेला. अर्थात या दरम्यान ‘लोणी’च्या धाकाने स्थानिक अधिकारी भलतेच दबावातही आले हा प्रकार वेगळाच.

त्यानंतर दोन तासांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेरकरांच्या साक्षीने लोकर्पण सोहळा रंगला. मात्र त्यानंतर मंगळवारपर्यंत (ता.१०) सदरील पथदिवे बंदच होते. त्यावरुन गेल्या पंधरा दिवसांपासून संगमनेर आणि लोणी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचा कलगीतुराही रंगला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संगमनेर दौर्‍याच्यावेळी विद्युतीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदारालाही हजर केले गेले आणि मंत्री महोदयांकडून त्याची कानउपटणीही पार पडली, मात्र तरीही त्यानंतर रस्त्यावरील दिवे उजळू शकले नाहीत. अखेर बुधवारच्या रुपाने ‘तो’ दिवस उजेडला आणि राजकीय रंगपंचमी साजरी झाल्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी बसस्थानक ते अमृतवाहिनी महाविद्यालयाचा परिसर दुधाळ रंगाने न्हाऊन निघाला.

त्यामुळे या महामार्गाच्या कामावरुन सुरु असलेली श्रेयवादाची लढाई आता तरी संपुष्टात येईल अशी सामान्यांना अपेक्षा असताना जे अंधारात घडलं, तेच लख्ख उजेडातही घडू लागलं. कोणालाही कल्पना नसतांना अचानक पेटलेल्या पथदिव्यांनी सुरुवातीला दोन्ही बाजू गोंधळल्या. मात्र त्यानंतर काही वेळातच उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशातच पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरु झाली. त्यातून आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘हॅप्पी हायवेवर’ आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाल्याने संगमनेरकरांच्या आनंदात भर.. अशा मथळ्याखाली समाज माध्यमातून वृत्त झळकावण्यात आले. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांचा आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी वरिष्ठ पातळीवरुन आमदार थोरात यांनी महामार्गावरील पथदिवे नियमित सुरु ठेवण्याबाबत सूचना देत त्याचा पाठपुरावा केला.

त्याचाच परिपाक बुधवारी महामार्गावरील दिवे पेटल्याने रस्त्यावर लखलखाट झाल्याचे सांगत ‘हॅप्पी हायवे’ कार्यक्रमाचा ओझरता उल्लेख करीत ‘त्या’ सोहळ्याचे वर्णनही करण्यात आले. त्यासोबतच संगमनेरकरांच्या आनंदात ‘लोणी’ आणि स्थानिक ‘भाजप’ कशाप्रकारे मिठाचा खडा टाकीत आहेत, त्यातून या मार्गावरील विद्युतीकरण कसे रखडले याचा प्रपंच मांडून थेट लोणीलाच कोपरखळीही हाणली गेली. त्यामुळे साहजिकच त्याचे प्रतिबिंब उमटले आणि स्थानिक भाजपानेही सुसंस्कृत राजकारणाचा अंधारातील चेहरा आजच्या उजेडात उघडा पडला.. अशा आशयाच्या मथळ्याने आमदार थोरातांवर टीका केली. केंद्राच्या निधीतून सुरु असलेल्या विकास प्रक्रियेला बदनाम करण्याचा डाव जागृत भाजपाने उघडा केला. कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याची परंपरा कायम आहे. सदरील कारस्थान ओळखून भाजपाने प्रशासनाला भाग पाडून दिवे सुरु केल्याचा उल्लेख करीत बुधवारी सुरु झालेले पथदिवे आपल्याच प्रयत्नाचा भाग असल्याचे दाखवण्यात आले.


गणेशोत्सवातील आमदार बाळासाहेब थोरात यांच्या ‘हॅप्पी हायवे’ कार्यक्रमापासून सुरु झालेला हा विषय १५ दिवस अंधारात राहिल्यानंतर बुधवारच्या लख्ख उजेडात पुन्हा चर्चेला आला आणि त्यातून शहराचे सौंदर्य उजळण्यासह राजकीय रंगांचीही उधळण सुरु झाल्याचे विहंगम दृष्य सध्या संगमनेरच्या विस्तारीत नाशिक महामार्गावर बघायला मिळत आहे.


नूतन महामार्ग झाल्याने दुर्लक्षित झालेल्या पुणे-नाशिक या शहरातून जाणार्‍या महामार्गाचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण व्हावे यासाठी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या महसूल मंत्रीपदाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त रस्ते विकास योजनेत प्रस्ताव दाखल करीत पहिल्या टप्प्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मिळवला. या योजनेनुसार या एकूण निधीतील ६० टक्के (४० कोटी) राज्याचे तर ४० टक्के (२५ कोटी) केंद्राचे असा निधी प्राप्त झाला. त्यातूनच हा महामार्ग प्रत्यक्षात उतरला. मात्र आता त्यावरुन संगमनेरात राजकीय कलगीतुरा रंगला असून केंद्राने २५ कोटींचा निधी दिल्याने या कामाचे श्रेय भाजपाचेच असा दावा केला जात आहे.

Visits: 30 Today: 2 Total: 116005

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *