साई मंदिरात दर्शनसह आरती पासचा काळाबाजार थांबणार! संस्थानने ओळखपत्र केले अनिवार्य; साईभक्तांकडून निर्णयाचे स्वागत

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्य नव्हे तर देशभरातून हजारो साईभक्त दररोज शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेऊन साईचरणी लीन होतात. तसेच अनेकजण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा अनेकदा काही एजंट घेतात आणि यातून साईभक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले असून जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास दिला जाणार आहे.

साईबाबांच्या दर्शनाला जगभरातील भाविक येतात. अनेकदा सामान्य दर्शन रांगेत असलेली गर्दी पाहून पेड दर्शनपास हा पर्याय निवडून अनेक जण हा पास घेतात व दर्शन घेतात. तर आरती पास घेण्यासाठीही अनेकदा भक्तांना रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र हे सगळं होत असताना काही एजंट साईभक्तांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या तक्रारी साईबाबा संस्थानला प्राप्त झाल्या होत्या. साईबाबा संस्थानच्या sai.org.in. ऑनलाईन पोर्टलवर या दोन्ही सुविधा उपलब्ध असल्या तरी अनेकदा याठिकाणी पास मिळत नाहीत. त्यामुळे एजंट याचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.

साईबाबा संस्थानला आलेल्या तक्रारीनंतर आता साईबाबा संस्थानने पेड दर्शन पास व आरती पासेससाठी आधारकार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पासची आवश्यकता नाही. मात्र पेड पास दर्शन किंवा आरती पास घ्यायचा असेल तर ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे. यासाठी तिरुपती बालाजी मंदिराच्या धरतीवर असणारा सॉफ्टवेअर साईबाबा संस्थानने आणलं असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, नवीन निर्णयाची अंमलबजावणी साईबाबा संस्थानने सुरू केली असून पेड पास दर्शन घेताना आता ओळखपत्राचीही एंट्री या नवीन सॉफ्टवेअरमध्ये केली जाते. त्याचबरोबर आरती पाससाठी आरतीला उपस्थित असणार्या सर्वच भक्तांचे ओळखपत्र सुद्धा अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन निर्णयानंतर अनेक साईभक्तांनी पास मिळण्यास उशीर होत असला तरी हे सुरक्षित असल्याचं सांगत या निर्णयाचे स्वागत केलं आहे.
