संगमनेर तालुका अडकतोय पुन्हा प्रलंबित अहवालांच्या फेर्यात! एखाद्या दिवशी डोंगराएवढी रुग्णसंख्या तर दुसर्याच दिवशी निम्म्याने घटीचे आकडे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील सरासरी रुग्णगतीत मोठी घसरण होवून दिलासादायक वातावरण निर्माण होत असतांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेल्या जिल्हा रुग्णालयाचा सावळा गोंधळ मात्र अजूनही सुरुच आहे. त्याचा फटका जिल्ह्याच्या कोविड मुक्तिला बसत असून तब्बल आठ दिवसांपासून ते महिन्याभरापर्यंतचे प्रलंबित अहवाल समोर येत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या शून्य होवूनही अनेक गावच्या कारभार्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. मंगळवारी संगमनेर तालुक्यातून अचानक 71 रुग्ण समोर आल्यानंतर आज त्यात आश्चर्यकारकरित्या निम्मी घट झाली आहे. यंत्रणेच्या गोंधळातून सुरु असलेला हा प्रकार सामान्यांच्या मनात भिती आणि संभ्रम निर्माण करणारा ठरत आहे. काल रुग्णसंख्येचा उच्चांक गाठणार्या संगमनेर तालुक्यात आज मात्र केवळ 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या 22 हजार 755 झाली आहे.

राज्यासह जिल्ह्याने कोविड संक्रमणाचा सर्वाधिक काळा काळ म्हणून एप्रिल आणि मे हे दोन महिने अनुभवले. या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 1 लाख 67 हजारांहून अधिक तर संगमनेर तालुक्यात 13 हजारांहून अधिक रुग्ण समोर आले. संक्रमणाच्या गेल्या वर्षभरातील रुग्णसंख्येपेक्षा या दोन महिन्यात समोर आलेली रुग्णसंख्या तिपटीनेे अधिक आहे. तर या कालावधीत जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा संक्रमणातून मृत्यूही झाला. या कालावधीतील संक्रमणाची गती आणि यंत्रणांवरील मर्यादा यामुळे संशीत रुग्णाचा प्रत्यक्ष स्राव घेतल्यानंतर त्याचा निष्कर्ष समारे येण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत होता. मृत्यूंच्या आकड्यांचा गोंधळ तर जूनच्या गेल्या 22 दिवसांत दररोजच समोर येत असून चालू महिन्यात आत्तापर्यंत तब्बल 2 हजार 499 मृत्यूचीं नोंद करण्यात आली आहे. यावरुनच यंत्रणांमधील सावळा गोंधळ सहज स्पष्ट होतो.

रुग्णसंख्येच्या बाबतीतही जिल्हा रुग्णालयाकडून असंख्य चुका झाल्या असून त्याचा फटका वेळोवेळी जिल्ह्यातील यंत्रणांना बसला आहे. आत्ताही तसाच प्रकार सुरु असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अहवाल समोर येवू लागल्याने कोविडची बाधा होवून ठिकठाक झालेल्यांसह काही मृतांचेही त्यावेळचे अहवाल आता पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभर केलेल्या चांगल्या कामाची शाबासकी मिळवण्यासह आता जिल्हा रुग्णालयाला नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियांचाही सामना करण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील संक्रमणाची धारही बोधट झाली, मात्र तरीही जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून वाढीव संख्या समोर येत असल्याने तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

आज (ता.23) शासकीय प्रयोगशाळेचे 17, खासगी प्रयोगशाळेचे 13 व रॅपीड अँटीजेनच्या सहा निष्कर्षातून संगमनेर शहरातील बारा जणांसह अकोले तालुक्यातील एक आणि संगमनेरच्या ग्रामीणभागातील 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील भारत नगर परिसरातील 37 वर्षीय तरुण, विद्यानगर मधील 71 वर्षीय महिलेसह 14 वर्षीय मुलगा व संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 व 47 वर्षीय इसम, 32, 30 व 21 वर्षीय तरुण, 32 व 27 वर्षीय महिला आणि 13 वर्षीय मुलीचा त्यात समावेश आहे. त्यासोबतच अकोले तालुक्यातील गणोरे येथील 29 वर्षीय महिलाही संगमनेरात उपचार घेत असून त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्याच्या ग्रामीणभागातील राजापूर येथील 76 वर्षीय महिला, घारगाव येथील 43 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, कुरकुंडीतील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, अकलापूर येथील 50 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुणी, मांडवे बु. येथील 50 वर्षीय इसम, मनोली येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव जाळीतील 24 वर्षीय महिला, नान्नज दुमाला येथील 52 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 31 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, सादतपूर येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 9 व एक वर्षीय बालिका, सोनुशी येथील 60 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 75 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सोनेवाडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, अंभोरे येथील 99 वर्षीय वयोवृद्ध महिला व शिबलापूर येथील 32 वर्षीय तरुणासह 25 वर्षीय महिला अशा एकूण 36 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची रुग्णसंख्या 22 हजार 755 झाली आहे.

जिल्ह्यातील मृतांसह अन्य काही तालुक्यांच्या प्रलंबित रुग्णसंख्येचा सावळा गोंधळ सुरु असतांनाही जिल्ह्यातील घटलेले संक्रमण अद्यापही अबाधित आहे. या श्रृंखलेत आजही समोर आलेली रुग्णसंख्या पाचशेच्या आतच असल्याने दिलासा कायम असून आज शासकीय प्रयोगशाळेचेे 36, खासगी प्रयोगशाळेचे 163 व रॅपिड अँटीजेनच्या 205 अहवालातून 404 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पारनेर 90, पाथर्डी 52, संगमनेर 36, श्रीगोंदा 32, नेवासा 31, शेवगाव 30, राहाता 22, अकोले व नगर ग्रामीण 21, जामखेड 15, राहुरी 13, कोपरगाव 10, श्रीरामपूर नऊ, अहमदनगर महापालिका क्षेत्र आठ आणि कर्जत व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी सात रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 77 हजार 221 झाली आहे.

कोविड संक्रमणाच्या सर्वाधीक भराच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातील संक्रमणाची गती देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये गणली गेली. त्यामुळे साहजिकच जिल्हा यंत्रणेसह जिल्हा रुग्णालयावरही दबाव वाढला होता. त्यातूनच रुग्णांच्या आकडेवारीसह जिल्ह्यातील मृतांचे आकडेही लपविण्यात आले. मात्र मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासोबतच्या बैठकातून समोर येणारी रुग्णसंख्या आणि त्या तुलनेत मृतांच्या आकड्यांची लपवालपवी उघड झाल्यानंतर आता जिल्हा रुग्णालयाकडून प्रलंबित अहवालांची राष्ट्रीय कोविड पोर्टलवर नोंद करण्यास सुरुवात झाली असून आजच्या स्थितीत समोर येणारे अनेक रुग्ण बरे होवून महिन्याचा कालावधी लोटला आहे, तर काहींचा कोविडने मृत्यूही झाला आहे. मात्र जिल्हा रुग्णालयाकडून आकड्यांचा गोंधळ अव्याहतपणे सुरुच आहे.

