… अखेर पठारावरील कोटमारा धरण पूर्ण क्षमतेने भरले! लाभक्षेत्रात आनंदाला उधाण; आता शेतकर्‍यांना परतीच्या पावसाची अपेक्षा


नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी, आंबीदुमाला, बोटा आदी गावांना वरदान ठरणार्‍या कोटमारा धरण खरीप हंगामाच्या शेवटी भरल्याने शेतकर्‍यांच्या जीवात जीव आला आहे. पावसाळा संपण्याची चिन्हे असताना धरणाने तळ गाठलेला होता. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होते. मात्र, शनिवारी (ता.७) धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाला उधाण आले आहे.

कुरकुटवाडी व आंबीदुमाला या दोन गावांच्या शिवेवर १५५.३९ दशलक्ष घनफूट क्षमतेचे कोटमारा धरण आहे. या धरणातील पाण्याचा फायदा या दोन गावांसह परिसरातील गावांनाही होत असतो. दरवर्षी पावसाळ्यात कोटमारा धरण तुडूंब भरून वाहत असते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटत असतो. मात्र यंदा धरण पाणलोटक्षेत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्याने हंगामाच्या शेवटापर्यंत धरण भरण्याची प्रतीक्षा करावी लागली. तोपर्यंत धरणाने तळ गाठलेला चित्र पाहावे लागत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. आता धरण भरल्याने शेतकर्‍यांच्या जीवात जीव आला आहे.

दरम्यान, पठारभागातील सर्वात मोठे धरण म्हणून कोटमारा धरणाची ओळख आहे. मात्र यंदा पावसाने हूल दिल्याने धरण भरण्याला हंगामाचा शेवट पाहावा लागला. शेवटी अकोले तालुक्यातील बदगी बेलापूर येथील जलाशय ओसंडल्याने तेथून पाणी कोटमारा धरणात विसावल्याने शनिवारी हे धरण ओसंडून वाहिले आहे. यामुळे लाभक्षेत्रात आनंदाला उधाण आहे. अजूनही परतीचा पाऊस बाकी असून, जर चांगला बरसला तर पाण्याचे उद्भव भरलील अशी भाबडी अपेक्षाही शेतकर्‍यांना लागून आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 119206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *