अवकाळीचा भातशेतीला तडाखा; आदिवासी शेतकर्यांचे नुकसान गरा भात भुईसपाट तर सोंगून ठेवलेला भातही जोरदार पावसाने भिजला

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा अवकाळी पावसाने कहर केला आहे. घाटघर येथे तब्बल 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या अचानक आलेल्या पावसाने मात्र अनेक आदिवासी शेतकर्यांच्या भातशेतीला फटका बसला असून गरा भात भुईसपाट झाला आहे. तर अनेकांनी सोंगून ठेवलेला भात अचानक आलेल्या पावसाने भिजला आहे.

गुरुवारी (ता.18) संध्याकाळी पाच वाजेनंतर भंडारदरा धरणाच्या पाणलोटात विजेच्या कडकडाटासह जोरदर पर्जन्यवृष्टी झाली. या अचानक आलेल्या पावसाने मात्र आदिवासी शेतकरी बांधवांची मात्र चांगलीच ताराबंळ उडाली. काही शेतकर्यांचा भात शेतामध्येच उभा असून पाच ते सहा दिवसांवर काढणीस आला आहे. तर काही शेतकरी बांधवांनी भात सोंगून शेतातच कापून आडवा टाकल्याचे दिसून आले. हा भात पावसाने भिजला असल्याने तो वाया गेल्याने अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच दिवाळीच्या आसपास झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकर्यांच्या गरे भातांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तर आता या अचानक आलेल्या पावसाने 1008, 98, कोळंबी या वाणाच्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या पावसामुळे घाटघर परीसरात पुन्हा धबधबे कोसळू लागल्याचे दृश्य दिसले. तर भंडारदरा येथे 21 मिलीमीटर पाऊस पडला. तसेच पांजरे 25 मिमी, रतनवाडी 29 मिमी तर वाकी येथे 2 मिमी पाऊस पडला. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा 11 हजार दलघफूटाच्या पुढे गेला असून धरणातून कोणताही विसर्ग सुरु नसल्याची माहीती धरणाचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांच्या अधिपत्याखाली प्रकाश चव्हाण यांनी दिली.

भंडारदरा परिसरात अचानक आलेल्या पावसाने शेतकरी बांधवांच्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने तत्काळ दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना मदत करावी.
– दिलीप भांगरे (सरपंच-शेंडी)
