पिंपळगाव खांडमधून हक्काचा एकही थेंब इतरत्र जाऊ देणार नाही! सीताराम गायकर यांचा इशारा; पिंपळगाव खांड येथे धरणे आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
मुळा खोर्‍यातील पिंपळगाव खांड जलाशयातून कोणतीही पाणी योजना जाऊ देणार नाही, असा सूचक इशारा अगस्ति कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम गायकर यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकरा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 65 कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून या योजनेसाठी पिंपळगाव खांड जलाशयातून पाणी देण्याचे प्रस्तावित निविदा जाहीर झाली आहे. या योजनेची जल विभागाद्वारे निविदा प्रसिद्ध झाली असून योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुळा परिसरातील पिंपळगाव खांड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पाणी बचाव कृती समितीने रविवारी (ता.12) पिंपळगाव खांड जलाशयावर धरणे आंदोलन करण्यात आले. अगस्ति कारखान्याचे संचालक सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन सुरू झाले.

या आंदोलनात कोतूळ परिसरातील बोरी, कोतूळ, वाघापूर, पांगरी, पिंपळगाव खांड, लिंगदेव, चास, पिंपळदरी, कोतूळ, मोग्रस, धामणगाव पाट, लहित खुर्द व लहित बुद्रुक परिसरातील शेतकर्‍यांसह आदिवासी भागातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सीताराम गायकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत धरणातून थेट पाणी दिले जाणार नाही. पठारभागासाठी पिण्याचे पाणी दिले पाहिजे या भूमिकेसोबत आम्ही आहोत. परंतु त्यासाठी पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस, मुळा नदीत खालच्या बाजूला स्वतंत्र साठवण बंधारा बांधून अगोदर पाणीसाठा निर्माण करावा व त्यातून या पाणी योजनेला पाणी पुरवठा करावा याबाबत आमची काही हरकत नाही. परंतु हक्काच्या पिंपळगाव जलाशयातून पाण्याचा फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पिंपळगाव धरण हे मुळा विभागाची संजीवनी असून, येथील शेतकरी वर्गास वंचित ठेऊन इतरत्र पाणी देण्यास आमचा विरोध आहे. पिण्याचे पाणी ही काळाची गरज आहे. ज्यांना पाणी द्यायचे आहे तेही आमचेच तहानलेले आहेत. या तहानलेल्या जनतेस योग्य पाणी पुरवठा व्हावा म्हणून आम्ही काही सूचना केल्या आहेत. मुळा नदीत अजून बर्‍याच प्रमाणात काही साईट असून तिथे नव्याने पाण्याचा स्रोत निर्माण करावा व या गावांना कायमचा पाणी प्रश्न सोडविण्यात यावा. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्राथमिक चर्चेत ही पसंती दर्शवली असून, लवकरच याबाबत शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ त्यांना पुन्हा भेटणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून पिंपळगाव खांड हे 600 दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधले गेले यातून परिसरातील गावांच्या शेतीचा पाणीप्रश्न सुटला आहे. परंतु या धरणातून पाणी योजना झाल्यास धरणाला आरक्षण लागल्यास परिसरातील शेतकरी कर्जबाजारी होऊन उध्वस्त होईल. सहाशे क्षमतेचा साठा हा तितकासा पुरेसा नाही. आजही शेतकर्‍यांना एप्रिल-मे मध्ये पाण्याचा तुटवडा भासतो त्यातच पाणी योजना झाल्यास हा साठा अपुरा पडेल म्हणून या धरणातून संगमनेर तालुक्यातील पठारावरील अकरा गावांसाठी थेट पाईपने पाणी पुरवठा करू देणार नाही. नाशिक येथे वरिष्ठ अभियंत्यांची याबाबत चर्चा झाली आहे. पिंपळगाव खांड धरणाच्या खालील बाजूस मुळा नदीवर काही साईट्स आहे याठिकाणी नवीन साठा बंधारा तयार करून त्यातून या योजनेला पाणी पुरवठा करा करावा. मात्र पिंपळगाव खांडच्या धरणात फुटबॉल टाकू दिला जाणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी वाघापूरचे भाऊसाहेब बराते, भाऊसाहेब रक्टे, लिंगदेवचे प्रभाकर फापाळे, भाऊसाहेब हाडवळे, सहदेव चौधरी, आत्माराम शेटे, शिवाजी वाल्हेकर, भानुदास डोंगरे, शरद चौधरी, प्रमोद मंडलिक, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, विजय शेटे, सुरेश देशमुख आदी शेतकर्‍यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 15 Today: 1 Total: 118423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *