पास्ते येथे जन्मदात्याने सुपारी देऊन केला मुलाचा खून सिन्नर पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल; घटनेने उडाली खळबळ
नायक वृत्तसेवा, सिन्नर
तालुक्यातील पास्ते येथील जन्मदात्या वडिलांनीच मुलाचा सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
राहुल शिवाजी आव्हाड (वय ३०) हा दारु पिऊन आईवडील व कुटुंबियांना त्रास देत असल्याने वडिलांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातीलच दोघांना ७० हजारांची सुपारी देऊन मुलाचा खून केल्याची घटना बुधवारी (ता.२७) उघडकीस आली. पास्ते ते हरसुले रस्त्यावर बंद पडलेल्या एका कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहुलचा मृतदेह आढळून आला. परिसरातील शंकर कातकाडे यांनी सर्वप्रथम शिवाजी याचा मृतदेह पहिला व तत्काळ सिन्नर पोलिसांना याबाबत कळविले. सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता राहुलच्या तोंडातून फेस निघत असल्याचे जाणवले, राहुलने आत्महत्या केली की घातपात याबाबत संभ्रम असताना नागरिकांच्या मदतीने राहुलला तत्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती.
मात्र, राहुलच्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनतर त्याच्या तोंडात विषारी औषधही टाकण्यात आल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांकडून राहुलच्या कुटुंबियांची आणि ग्रामस्थांकडे चौकशी केली. यावेळी पोलिसांना राहुल हा दारु पिण्याच्या आहारी गेला होता व तो आपल्या आईवडिलांना त्रास देत असल्याचे समजले. तसेच तो गावातील नागरिकांही त्रास देत असल्याचीही माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावला. यावरुन राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड (वय ५०) यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड (वय ४०) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (वय ४३) या दोघांना ७० हजार रुपये देण्याचे कबूल करत सुपारी दिली.
त्यानंतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्यावेळी राहुलला एकांतात गाठत त्यास हरसुले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहुलचा गळा दाबून खून केला. राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असे वाटावे म्हणून दोघांनी त्याच्या तोंडात विषारी औषध टाकून त्यास कंपनीतील मीटर रूममध्ये टाकून दिल्याची दोघांनी कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोठाळे करत आहेत.