थरार! संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांवर सशस्त्र दरोडेखोरांचा हल्ला! गावकर्यांच्या मदतीने थरारक पाठलाग करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या; एकजण मात्र पसार..
नायक वृत्तसेवा, घारगाव
जीवघेणी शस्त्र घेवून दरवडा घालण्याच्या हेतूने चाचपणी करणार्या चार दरोडेखोरांना घारगाव पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडले. सदरचा प्रकार आज (ता.21) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बोटा शिवारात घडला. यावेळी पोलीस आणि काही नागरिकांची दरोडेखोरांशी झटापट झाल्याने सत्तुरचा घाव बसून एका पोलीस कर्मचार्यासह पोलिसांच्या मदतीला धावलेला एक नागरिकही जखमी झाला असून अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर पसार झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी दरोडेखोरांकडून प्राणघातक शस्त्रांसह दरवडा घालण्याचे साहीत्य व चाळीस हजार रुपये किंमतीची दोन दुचाकी वाहने जप्त केली असून चौघांना गजाआड केले आहे. आपल्या जीवाची बाजी लावून घारगाव पोलिसांनी बजावलेल्या या कर्तव्याचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दित चोख बंदोबस्त ठेवून रात्रीची गस्तही वाढवण्यात आली होती. विस्तीर्ण भूभागात पसरलेल्या व संपूर्ण डोंगराळ भागातील जवळपास 46 गावांचा पसारा सांभाळणार्या घारगाव पोलिसांनीही या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली होती. त्याच अनुषंगाने हवालदार संजय विखे, पोलीस नाईक गणेश लोंढे व पोलीस शिपाई किशोर लाड हे तिघे सरकारी वाहनातून पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा शिवारात गस्त घालीत असताना अचानक त्यांची नजर दोन मोटारसायकलवरुन सुसाट वेगाने जाणार्या पाच जणांवर पडली. काही अंतरापर्यंत पाठलाग करीत पोलिसांनी त्यांना थांबण्याची सूचना केली असता त्या पाचही जणांनी मोटारसायकल सोडून आडवाटेने पळून जाण्यास सुरुवात केली.
त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्या तिघाही पोलीस कर्मचार्यांनी आपले वाहन सोडून त्यांचा पायी धावत पाठलाग सुरु केला. यावेळी पोलीस आणि त्या पाच जणांमध्ये झटापटही झाली. मात्र तोपर्यंत पळून जाणार्या व्यक्तींकडे प्राणघातक शस्त्रे असतील याची कोणतीही कल्पना पोलिसांना नव्हती. या झटपटीत दरोडेखोरातील एकाने पो.ना.गणेश लोंढे यांच्यावर लोखंडी सत्तूरने वार केला, त्यात ते जखमी झाल्याने उर्वरीत दोन्ही कर्मचार्यांचे लक्ष्य त्यांच्यावर खिळले. या गोंधळात ‘त्या’ पाचजणांनी पुन्हा धूम ठोकली, मात्र पोलिसांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. या गदारोळात हवालदार विखे यांनी माळवाडीचे पोलीस पाटील संजय जठार यांना फोन करीत ‘शिवारात दरोडेखोर आहेत, आम्ही पाठलागावर आहोत, गावकर्यांना घेवून मदतीला या..’ असा संदेश दिला. त्यावरुन त्यांनीही गावातील आठ-दहा जणांना सोबत घेवून काही वेळातच घटनास्थळ गाठले.
आपल्या दिशेने गावकरी येत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी जवळच्या शेतात दडी मारली, मात्र पाठीमागे असलेल्या जिगरबाज घारगाव पोलिसांची नजर त्यांच्यावर खिळून असल्याने गावकरी येताच सगळ्यांनी शेतात घुसून त्या दरोडेखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या पाचही जणांनी पोलीस आणि गावकर्यांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात श्रीकांत जठार या गावकर्यासह एका पोलीस कर्मचार्याच्या हाताला दगड लागल्याने ते दोघेही किरकोळ जखमी झाले. मात्र पोलीस आणि गावकर्यांनी न डगमगता त्यांच्यावर झडप घातली. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्यातील भाऊ लिंबा दुधवडे (वय 25, रा. गाढवलोळी, अकलापूर) हा दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी ठरला, तर जानकू लिंबाजी दुधवडे (वय 22), संजय निवृत्ती दुधवडे (दोघेही रा. गाढवलोळी, अकलापूर), दत्तू बुधा केदार (वय 19, रा. नांदूर खंदरमाळ) व राजू सुरेश खंडांगळे (वय 25, रा. माळवाडी, बोटा) या चौघांना घारगाव पोलिसांनी माळवाडीतील ग्रामस्थांच्या मदतीने पकडले.
यावेळी सर्वांची झडती घेतली असता आरोपी क्रमांक एककडे लोखंडी सत्तूर व खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेली लाल मिरचीची पूड आढळून आली, आरोपी क्रमांक दोनच्या कंबरेच्या पाठीमागील बाजूला हेक्सा ब्लेडचे पान व हातात दगड आढळले, आरोपी क्रमांक तीनच्या पुढील बाजूला कंबरेला चाकू व खिशात मिरचीची पूड व चौथ्या आरोपीच्या खिशात स्क्रू ड्रायव्हर, पक्कड आणि मिरचीची पूड आढळून आली. त्यासोबतच पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांनी सोडून दिलेल्या हिरो स्प्लेंडर (क्र.एम.एच.17/बी.क्यू.5952) या मोटारसायकलच्या सीटच्या खाली मिरची पूड व नायलॉन दोरी आणि दुसर्या विना क्रमांकाच्या होंडा स्प्लेंडर या दुचाकीच्या सीटला लोखंडी गज बांधलेला आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी 40 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकलींसह वरीलप्रमाणे हत्यारे जप्त करीत चौघांनाही घारगाव पोलीस ठाण्यात आणले. पो. ना. लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील चौघांसह पसार झालेल्या दरोडेखोरांवर प्राणघातक शस्त्र व दगडांचा वापर करुन पोलीस व गावकर्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 307, दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे कलम 399, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कलम 353 व 402 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पकडण्यात आलेल्या चौघांनाही आज न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. घारगाव पोलिसांनी गावकर्यांच्या मदतीने केलेल्या या जिगरबाज कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक राहुल मदने व घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पथकातील कर्मचार्यांचे अभिनंदन केले आहे.
सतत अवर्षणाचा सामना करणार्या तालुक्याच्या पठारभागातील बोटा-माळवाडी परिसरात काही महिन्यांपूर्वी शेतकर्यांच्या विहिरीतील विद्युत मोटारी चोरुन नेण्याचे सत्र सुरु झाले होते. दररोज एका मागोमाग घडलेल्या या घटनांमध्ये आठ ते दहा शेतकर्यांच्या मोटारी चोरीला गेल्या होत्या. त्यामुळे या परिसरात चोरट्यांची दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नसताना आता दरोडेखोरांची टोळीच पोलिसांच्या हाती लागल्याने व पकडलेल्या आरोपीतील काहींवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याने पठारावरील मोटार चोरीसह अन्य काही गुन्हे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.