संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न! माजीमंत्री बाळासाहेब थोरात; शहरात विकास व बंधुभावाचे वातावरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या रविवारी जोर्वेनाका येथे घडलेल्या मारहाणीच्या घटनेचे प्रतिध्वनी तालुक्यातून कानावर येत असतांना या घटनेचा निषेध आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी संगमनेरात ‘भगवा मोर्चा’ आयोजित केला आहे. त्या पार्श्वभूमीवर एकीकडे पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती पावलं उचलली जात असतांनाच राज्याचे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे शांततेचे आवाहन करणारे पत्र चर्चेत आले आहे. या पत्रातून जोर्वेनाका येथील घटनेला धार्मिक अथवा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जावू नये असे आवाहन करतांना गुन्हेगारांना जात, धर्म नसतो. या घटनेत दोषी असलेल्यांना कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली आहे. सोशल माध्यमात फिरत असलेल्या या पत्रावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून काहींनी त्याचे समर्थन तर काहींनी त्याचा विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

रविवारी (ता.28) जोर्वेनाका येथे जोर्वे गावातील आठ तरुणांना दोन टप्प्यात जमावाने बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी ज्ञात नावांसह एकूण दोनशे जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करीत आत्तापर्यंत 20 जणांना अटक केली. त्यामुळे वातावरणातील तणाव निवळल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटनांनी शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधून मंगळवारी (ता.6) सकल हिंदु समाजाच्या बॅनरखाली संगमनेर तालुका बंदसह सकाळी 9 वाजता शहरातून ‘भगवा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली. त्यावरुन संगमनेरचे वातावरण तापत असतांनाच आज (ता.3) सकाळी राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे ‘पत्र’ झोतात आले आहे.

‘विनम्र आवाहन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रात थोरात म्हणतात की, ‘जोर्वे नाक्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. त्यामध्ये जे गुन्हेगार होते त्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. प्रशासनही याची काळजी घेत असल्याचे दिसते. परंतु या घटनेला जातीय, धार्मिक किंवा सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न केला जावू नये. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. जो गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. संगमनेरमध्ये असलेले विकासाचे आणि बंधुभावाचे वातावरण कौतुकास्पद आहे, आपण सर्व त्याचे साक्षीदार आहात. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून, संगमनेरला अस्थिर करण्याचा प्रयत्नही सुरु आहे हे नाकारता येणार नाही. याच घटकाकडून जोर्वे नाक्यावर घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात आहे, यामागे दडलेला राजकीय हेतू आपणासही ठावूक आहे. एखाद्या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देवून संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवू देवू नका, आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन आपण करतो.’ अशा आशयाचा मजकूर या पत्रातून मांडण्यात आला आहे.

आज सकाळपासूनच थोरात यांचे हेच पत्र सोशल माध्यमात व्हायरल झाले असून व्हॉट्सअॅपवरील विविध समूहांमध्ये त्यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काहींनी थोरात यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे, तर काहीजण सदरील घटनेचे दाखले देत या पत्राकडे ‘मतपेटीची काळजी’ म्हणूनही बघत आहेत. त्यामुळे सोशल माध्यमातून संगमनेरात वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. या पत्राचा परिणाम येत्या मंगळवारी दिसतो की नागरीक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होतात हे पाहणे आता औत्सुक्याचे बनले आहे.

गेल्या रविवारी जोर्वेनाका येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी निघणार्या मोर्चासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील विविध संस्था, संघटना, विविध समाजांसह ग्रामीण भागातील तरुणांची मंडळे आणि ग्रामपंचायतींशी संपर्क साधून गावबंद ठेवून या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे काल-परवापर्यंत जोर्वेनाका आणि तेथून जाणार्या रस्त्याचा वापर करणार्या चौदा गावांसह संगमनेर शहरापुरता मर्यादीत असलेला हा विषय आता तालुकाभर पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे पत्र समाज माध्यमात व्हायरल झाल्याने जोर्वेनाका मारहाण प्रकरणाच्या चर्चेला वेगळे वळण प्राप्त झाले आहे.

