माळवाडी शिवारात ट्रकचा टायर डोक्यावरुन गेल्याने तरुणाचा मृत्यू पावसाने दुचाकी घसरुन अपघात; ट्रकचालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात


नायक वृत्तसेवा, घारगाव
नाशिक-पुणे महामार्गावरील माळवाडी (बोटा, ता.संगमनेर) परिसरात झालेल्या पावसाने मोटारसायकल घसरून पाठीमागे बसलेला अठ्ठावीसवर्षीय तरुण रस्त्यावर पडला. मात्र, पाठीमागून येणार्‍या ट्रकचे टायर डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघाताची घटना मंगळवारी (ता.२६) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दुचाकीचालक तेजस गणेश मधे (वय ३२), प्रीती तेजस मधे (वय २), सुनील भीमा मधे (वय २८) हे तिघेजण दुचाकीवरून (क्र. एमएच.१७, बीएच.६६३१) घारगाव येथून आळेफाट्याच्या दिशेने चालले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते माळवाडी (बोटा) परिसरात आले असता पावसाने त्यांची दुचाकी घसरली. यातील पाठीमागे बसलेला सुनील मधे महामार्गावर पडल्याने पाठीमागून आलेल्या ट्रकचा (क्र. एमएच.२०, ईजी.३७२६) टायर त्याच्या डोक्यावरून गेला. यात सुनीलचा जागीच मृत्यू झाला. अपघातात तेजस मधे व प्रीती मधे सुदैवाने बचावले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनेष शिंदे, सुनील साळवे, योगीराज सोनवणे यांसह पोलीस पाटील संजय जठार, शिवाजी शेळके, गणेश शेळके, गणेश काळे, योगेश काळे आदिंनी धाव घेत मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहेत.

Visits: 18 Today: 2 Total: 113292

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *