कासारवाडी शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह! चार दिवसांपूर्वी तालुका पोलीस ठाण्यात झाली होती बेपत्ता झाल्याची नोंद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठवडाभरापूर्वी कोल्हेवाडीतून बेपत्ता झालेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह कासारवाडी शिवारातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचा मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी मयत इसमाच्या पत्नीने गेल्या शुक्रवारी आपला पती प्रदीप पोपट कोल्हे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. सदरचा मृतदेह त्याच्याच असल्याची खात्री पटल्यावर उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हेवाडी येथे राहणारा प्रदीप पोपट कोल्हे (वय 32) हा तरुण गेल्या आठवड्यात बुधवारी (ता.22) दवाखान्यात जातो असे सांगून घराबाहेर पडला. जाताना त्याने आपली दुचाकी, मोबाईल व जवळील सर्व चीजवस्तू घरातच ठेवल्या होत्या. सायंकाळपर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचे मित्र व नातेवाईकांकडे चौकशीही केली, मात्र तो कोठेही आढळला नाही. त्यामुळे गेल्या शुक्रवारी (ता.24) त्याच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.

सोमवारी (ता.27) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासारवाडी शिवारातील एका शेतात असलेल्या विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे एका शेतमजूराने पाहीले. त्याने याबाबत शेतमालकाला सांगितल्यानंतर त्यांनी कासारवाडीच्या कामगार पोलीस पाटीलांना याबाबत माहिती दिल्यानंतर सायंकाळी उशिराने शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी स्थानिकांच्या मदतीने दोरखंडाच्या सहाय्याने सदर तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र त्याच्या जवळ ओळख पटविण्यासाठी काहीच नसल्याने आज सकाळपर्यंत त्याची ओळख पटली नव्हती. याबाबत आसपासच्या पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी करता 24 सप्टेंबररोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात प्रदीप पोपट कोल्हे (वय 32, रा.कोल्हेवाडी) हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यातील वर्णनावरुन मयत व्यक्ती आणि बेपत्ता व्यक्तिमध्ये साम्य आढल्याने पोलिसांनी तक्रारदार महिलेला सदर मृतदेह दाखविला असता तो आपला पती असल्याचे त्यांनी ओळखले. उत्तरीय तपासणीनंतर सदरचा मृतदेह मयताच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात आला. त्याच्यावर कोल्हेवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मयत प्रदीप कोल्हे याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा संसार आहे.

