आकारी पडीत जमिनीचा प्रश्न पंतप्रधानांकडे न्यायचा का? ः डॉ.विखे मुठेवाडगाव येथील कार्यक्रमात सत्ताधार्‍यांवर साधला निशाणा

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
विकासकामांच्या प्रारंभासाठी येथील लोकप्रतिनिधी संबंधित खात्यातील मंत्र्यांना निमंत्रित करतात. मात्र, त्यांच्याकडून शेती महामंडळाच्या आकारी पडीत जमिनीचा प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आता आकारी पडीत जमिनीचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जायचा का, असा सवाल खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

तालुक्यातील मुठेवाडगाव येथे एका कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. याप्रसंगी माजी सभापती दीपक पटारे, उपसभापती नितीन भागडे, बबन मुठे, गिरीधर आसने, गणेश मुदगुले व डॉ.शंकर मुठे उपस्थित होते. खासदार डॉ.विखे म्हणाले, स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमी पक्ष व सत्ताविरहित राजकारण केले. त्यांनी विखे कुटुंबावर प्रेम करणारी एकनिष्ठ माणसं निर्माण केली. त्यांच्या पाठबळावर आम्ही आज यशस्वी वाटचाल करीत असून, त्यापैकीच मुठे कुटुंबीय आहेत.

अतिराजकारणामुळे श्रीरामपूर तालुक्याची ही अवस्था झाली आहे. अकोले-पैठण महामार्ग झाल्याशिवाय श्रीरामपूरच्या विकासाला चालना मिळणार नाही. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्याच्या प्रतीक्षेत अनेक तरुण कार्यकर्ते वृद्ध झाले. म्हणून आता वेळ व परिस्थितीनुसार पुढार्‍यांनी बदलणे गरजेचे आहे. आमच्या विरोधात बोलणार्‍यांनी देखील कधी तरी विखे पाटलांची मदत घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन (आरटीओ) कार्यालय संगमनेरला हलविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पटारे यांनी सांगितले. त्यावर खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी नेत्यांमधील फरक समजून घ्यावा. काही नेतेमंडळी आपल्या तालुक्यात घेऊन जाण्यासाठी येतात. मात्र, आम्ही काही तरी देऊन जाण्यासाठी येतो. हे कार्यालय इतरत्र हलवले, तर त्याविरोधात लढा देणार असल्याचे खासदार डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *