संगमनेर तालुक्यात अवघे तिनशे सक्रीय संक्रमित रुग्ण..! आज शहरातील रुग्ण संख्येत झाली वाढ, एकूण तीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारपर्यंत तालुक्याच्या ग्रामीणभागातील संक्रमणाची गती कायम होती मात्र आज शहरी भागातही अधिक रुग्ण समोर आले आहेत. तालुक्याच्या एकूण संक्रमणात या महिन्याच्या सुरुवातीपासून काहीशी घट झाली आहे, मात्र कमी झालेल्या संख्येतही आजवर ग्रामीणभाग आघाडीवर होता. आज मात्र प्राप्त झालेल्या तीस अहवालातील निम्मे अहवाल शहरातील तर निम्मे ग्रामीण भागातील आहेत. आज खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका आता 3 हजार 886 वर पोहोचला आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 307 वर पोहोचली आहे.
या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून संगमनेर तालुक्यात दररोज समोर येणारी रुग्णसंख्या अपवाद वगळता पन्नासच्या आसपास राहीली आहे. गेल्या पंधरवड्यातील निरीक्षणावरुन तालुक्यातील संक्रमणाचा वेग कमी झाला आहे, मात्र ग्रामीणभागातील संक्रमणात दररोज नवनवीन गावे आणि वस्त्या समोर येत असल्याने धोका टळलेला नाही हे निश्चित. त्यामुळे शहरी असो अथवा ग्रामीण प्रत्येक नागरिकाने शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणेे अत्यंत आवश्यक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणभागातील नागरिकांकडून कोविडबाबत अद्यापही गांभिर्य पाळले जात नसल्याने आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील 170 पैकी तब्बल 150 गावे (88.24 टक्के) कोविडच्या झपाट्यात आली आहेत.
आज खासगी प्रयोगशाळेकडून सतरा तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात शहरातील पंधरा जणांचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्यांंमध्ये शहरातील मालदाड रोड परिसरातील 42 व 35 वर्षीय तरुणासह 37 वर्षीय दोन महिला व सात वर्षीय बालक, जनतानगर परिसरातील 59 वर्षीय इसमासह 22 वर्षीय महिला, साईनगर परिसरातील 21 वर्षीय महिला, पोलिस वसाहतीतील 50 वर्षीय इसम, सदाशंकर नगर परिसरातील 42 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 46 वर्षीय इसमासह 42 वर्षीय महिला, देवाचा मळा भागातील 26 वर्षीय तरुण, नेहरु चौकातील 80 वर्षीय वयोवृद्ध महिला व शिवाजीनगर परिसरातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
शहरासह तालुक्यातही आज 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात सारोळे पठार येथील 69 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, 60 व 27 वर्षीय महिला, राजापूरमधील 42 वर्षीय तरुण, झोळे येथील 22 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक मधील 39 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 55 वर्षीय महिला, निमगाव खुर्द येथील 30 वर्षीय महिला, कनोली येथील 59 वर्षीय इसम, माळेगाव हवेली येथील 80 वर्षीय वयोवृद्ध महिला व घुलेवाडी येथील 42, 35 व 34 वर्षीय महिलासह 14 वर्षीय मुलगा आदी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्ण संख्येने 39 व्या शतकाच्या दिशेने मार्गक्रमण करताना 3 हजार 886 रुग्णसंख्या गाठली आहे.
दृष्टीक्षेपात संगमनेर तालुका..
गेल्या 30 मार्चपासून आजवर संगमनेर तालुक्यातील 18 हजार 433 नागरिकांचे स्राव तपासण्यात आले. त्यात 12 हजार 71 स्रावांची तपासणी रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे, 3 हजार 970 स्रावांची चाचणी शासकीय प्रयोगशाळेकडून तर 2 हजार 392 जणांची तपासणी खासगी प्रयोगशाळेद्वारे करण्यात आली. एकुण झालेल्या चाचण्यांतून पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याची सरासरी आजही 20.91 टक्क्यावर कायम आहे.
तालुक्यात कोविडचे संक्रमण सुरु झाल्यापासून आजवर संगमनेर शहरात 1 हजार 123 तर ग्रामीणभागात 2 हजार 763 रुग्ण समोर आले. शहरातील 1 हजार 44 रुग्णांनी उपचार पूर्ण केले असून सध्या केवळ 82 जणांवर उपचार सुरु आहेत, तर आत्तापर्यंत शहरातील 12 जणांचा बळी गेला आहे. तालुक्यातील 149 गावांमध्ये कोविडचा संसर्ग पोहोचला असून त्यातून ग्रामीणभागातील 2 हजार 763 जणांना कोविडची लागण झाली आहे. 2 हजार 495 जणांनी उपचार पूर्ण केले असून सध्या 240 जणांवर उपचार सुरु आहेत. दुर्दैवाने ग्रामीणभागातील 28 जणांना आत्तापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील कोविडचा मृत्यूदर 1.04 टक्क्यांपर्यंत खाली अला असून आजवर तालुक्यातील 3 हजार 539 रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची आजची सरासरी 91.78 टक्के आहे.