आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा दोन तास अधिक वेळेपर्यंत सुरु राहणार! उद्याने, ग्रंथालये यासह आठवडे बाजार व जनावरांचे बाजार भरवण्यासही सशर्त परवानगी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत हळुहळु टाळेबंदीचे निकष बाजूला सारुन राज्य शासनाने वेगवेगळे उपक्रम सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार अहमदनगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी आदेश बजावून आजपासून जिल्ह्यातील बाजारपेठा सकाळी नऊ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यासोबतच आजपासून ग्रंथालये व उद्यानांनाही परवानगी देण्यात आल्याने तब्बल सहा महिन्यांनंतर बालगोपाळांना नियमांच्या अधिन राहुन मौजमस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या दरम्यान मात्र जमावबंदी आदेश कायम असणार असून रात्री 10 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत सामान्य माणसांच्या सार्वजनिक वावरण्याला मनाई करण्यात आली आहे.


बुधवारी राज्य शासनाने ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत राज्यातील अनेक उपक्रमांवरील निर्बंध सशर्त शिथील केले. त्याअनुषंगाने राज्यातील त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरुप निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज आदेश बजावले असून त्यातून आजपासून काही उपक्रम सुरु करण्यासह सुरु असलेल्या उपक्रमांच्या वेळेतही बदल केले आहेत. मात्र या सर्वांसाठी सामाजिक अंतर, सॅनिटाईझेशन आणि मास्क या नियमांचे पालन करण्याची सक्ती कायम ठेवण्यात आली आहे.


जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेल्या आदेशानुसार आजपासून जिल्ह्यातील शासकीय व खासगी ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच दुकाने व बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी आजपासून सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेत सर्व आस्थापने, दुकाने व बाजारपेठा सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. विवाह व अन्य व्यक्तिगत कार्यक्रमांना जास्तीतजास्त 50 आणि अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांना जास्तीतजास्त 20 जणांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.


उद्याने आणि सार्वजनिक मोकळ्या जागेत फिरण्यास, व्यायाम करण्यासही आजपासून सुट देण्यात आली असून तब्बल सहा महिन्यानंतर उद्यानांची कवाडे उघडणार असल्याने बालगोपाळांमध्ये आनंदाला उधाण आले आहे. या आदेशानुसार ग्रामीण अर्थचक्राचे मूळ असलेले आठवडे बाजार व जनावरांचे बाजार सुरु करण्यासही परवागनी देण्यात आली आहे. मात्र संगमनेरातील शनिवारचा आठवडे बाजार खुप मोठा आणि व्यापक भरत असल्याने त्याला परवानगी दिली आहे किंवा कसे याबाबत स्थानिक प्रशासनाकडून अद्यापही स्पष्टता करण्यात आलेली नाही.


प्रतिबंधित क्षेत्रासह उर्वरीत सर्व भागातील शाळा, महाविद्यालये व धार्मिक स्थळे यापुढेही बंदच राहणार आहेत. मात्र ऑनलाईन व दुरस्थ शिक्षण प्रणाली, त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळून पन्नास टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीला परवागनी देण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यात लागू असलेले कलम 144 कायम ठेवण्यात आले असून पाच अथवा पाचापेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय 31 ऑक्टोबरपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 या कालावधीमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वावरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.


मिशन बिगीन अगेन अंतर्गत टाळेबंदीतून सुट देण्यात आली असली तरीही शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्याची सक्तीही या आदेशान्वये करण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणार्‍या इसमाविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशाराही या आदेशातून देण्यात आला आहे.

Visits: 123 Today: 4 Total: 1101498

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *