राज्यातील सरकार हे गतिमंद सरकार ः तनपुरे विकासकामांना स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यातील सरकार गतिमंद सरकार आहे. महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या विकासकामांना या सरकारने स्थगिती दिली. येत्या पंधरा दिवसांत त्याचे कार्यारंभ आदेश न आल्यास नगर-मनमाड महामार्गावर १९ सप्टेंबरला मोठा रास्ता रोको केला जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघातील २९ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळालेली होती. सध्याच्या गतीमान म्हणवणार्या सरकारने कामांना स्थगिती दिली. त्याच्या निषेधार्थ व या कामाचे कार्यारंभ आदेश त्वरीत निघावेत या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरडगाव येथे राहुरी-नेवासा या रस्त्यावर हे आंदोलन झाले. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या सचिव के. पी. पाटील यांनी पंधरा दिवसात कार्यारंभ आदेश देण्याचे तोंडी आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे आंदोलनाचे नेते प्राजक्त तनपुरे यांना दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी आमदार तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघातील सुमारे २९ कोटी रुपयांची रस्ता विकासाची कामे महाविकास आघाडीने मंजूर केली. गेल्या चार महिन्यांपासून कार्यारंभ आदेश न दिल्याने ही कामे सुरू झाली नाहीत. हे सरकार विकासाच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत. यांना विकासाच्या कामाच्या फाईलवर सह्या करायला वेळ नाही. मात्र विरोधकांची कामे हाणून पाडण्यात व त्यांना गुंतवण्यात वेळ आहे. राहुरी मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर येथील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर असलेल्या व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यारंभ आदेश देण्यास शासनाकडून विलंब होत आहे.

जोपर्यंत संबंधित विभागाच्या अधिकार्याकडून लेखी उत्तर मिळत नाही. तोपर्यंत रास्ता रोको थांबणार नाही व येथून उठणार नाही., अशी भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकार्यांची पंचायत झाली. त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत आमदार तनपुरे यांची भूमिका सांगितली. त्यानंतर सुरुवातीला एक महिन्याची मुदत मागितली पण तनपुरे यांनी यास नकार तिला व तातडीने आठ दिवसांत कार्यवाही करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने उपअभियंता एस. जी. गायकवाड यांनी उद्यापासूनच आरडगाव उपकेंद्र ते केंदळ बुद्रुक रस्त्याचे तसेच राहुरी ते वाघाचा आखाडा, टाकळीमियाँ, लाख रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले जाईल व उर्वरित मतदारसंघातील सर्व कामे १८ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी माजी उपसभापती रवींद्र आढाव, सदाशिव तारडे, डॉ. राजेंद्र बानकर, विक्रम पेरणे, निलेश जगधने, नितीन काळे यांची भाषणे झाली. आरडगावचे माजी उपसरपंच सुनील मोरे यांनी सरकारवर सडकून टीका केली.
