पावसाचा जोर वाढल्याने भात पिकाला जीवदान पाणलोटासह धरण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण


नायक वृत्तसेवा, राजूर
बुधवारपासून (ता.६) भंडारदरा परिसरात पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने भात पिकाला संजीवनी मिळाली आहे. पावसाचे आगार असलेल्या घाटघर येथे मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासांत १२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणलोटासह धरण लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोटात बुधवारी सायंकाळपासून पाऊस सुरु झाला. गुरुवारी व शुक्रवारी पाणलोटासह परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. गत आठ ते दहा दिवस पाणलोटात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भातखाचरांमधील पाणी कमी झाल्याने भातपिके धोक्यात आली होती. पुन्हा पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने भातपिके जोमाने उभी राहिल्याचे सुखावह चित्र पाहायला मिळत आहे. यंदा पाऊस दीर्घकाळ गायब झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. खरीपातील अनेक पिके पावसाअभावी जळून गेली आहेत. मात्र, आता पाऊस सुरू झाल्याने उरलेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले.

आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे अर्थचक्र भात पिकावरच अवलंबून असते. त्यामुळे दरवर्षी भाताचे चांगले उत्पादन काढून वर्षभराची तजवीज करण्यासाठी शेतकरी सरसावतात. परंतु, यावर्षी पावसाने हूल दिल्याने शेतकरी संकटात सापडले. अक्षरशः काही ठिकाणचे भातपीक हातातून निघून गेले. मात्र, उरलेले पीक तरी पदरात पडावे म्हणून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांना पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर पाणलोटातील कळसूबाई शिखरावरही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कृष्णावंती नदी दुथडी भरुन वाहत आहे. यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात आनंदाला उधाण आले आहे.

गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस
भंडारदरा ः ६७ मिमी.,
घाटघर ः १२८ मिमी.,
पांजरे ः ७९ मिमी.,
रतनवाडी ः ९७ मिमी.,
वाकी ः ४३ मिमी.,
निळवंडे ः ३६ मिमी.,
आढळा ः १५ मिमी.,
अकोले ः ६२ मिमी.,
कोतूळ ः मिमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *